शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा; शिवरायांची महागाथा आता भव्य पडद्यावर

Riteish deshmukh: आज शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शिवजन्म सोहळ्यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता अभिनेता रितेश देशमुखने शिवजयंतीच्या खास मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे तो दिग्दर्शन करणार आहे. सोशल मीडियावर रितेशने त्याच्या नाव चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा

रितेशच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘राजा शिवाजी’ असे आहे. रितेश इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले की, ‘इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.”

“शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’,” अशी पोस्ट लिहित रितेशने चित्रपटाची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार?याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेले नाही. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जिनेलियाची पोस्ट

रितेशसह जिनेलियाने देखील नव्या चित्रपटाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो. हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे. ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

पुढे तिने लिहिले की, “‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती. शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.”