रिपरिप पावसानंतर जामखेडमध्ये रस्त्यांची चाळण

जामखेड – शहरातील रस्त्यांची समस्या आता नवीन राहिली नाही. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पाऊस ओसरल्यानंतर शहरातील रस्त्यांवर मुरुम तसेच काही रस्त्यांवर डांबरीकरणाने खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र आता चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळातच वाहनधारक व पादचाऱ्यांना पुन्हा तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत, मात्र असे असूनही प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.

निवडणुकीदरम्यान या रस्त्यांवरील खड्ड्यांची अधिक प्रमाणात चर्चा झाली. नगर – बीड- खर्डा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत आहे. खर्डा चौक ते लक्ष्मीआई मंदिर रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम रखडल्याने ते पावसाळा आला तरी होऊ शकले नाही. परिणामी पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालक, पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्यांवर मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पुन्हा चार दिवसांपासून सुरु झालेल्या रिपरिप पावसाचा परिणामामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला आहे.

Leave a Comment