पिंपरी | मावळ तालुक्यातील रस्त्यांची वाट बिकट

मावळ – मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट बिकट झालेली असून ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट रस्ते केलेले असल्याने या पावसाळ्यातही ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार आहे. दमदार पावसाला सुरवात होण्यापूर्वी गावांतील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही चांगले रस्ते नाहीत. अनेक ठिकणी माती, खडी, मुरूम टाकलेले रस्ते आहेत. त्यातूनच ग्रामस्थांना वाट काढावी लागते. पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल, राडारोडा पसरतो. परिणामी वाहने घसरण्याचे प्रकार घडतात. तर, अनेकदा गंभीर अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील गावांमधील रस्त्यांची डागडुजी, दुरुस्ती करण्याची गरज आहे.

पाटण ग्रामस्थांना करावी लागते कसरत
कार्ला – मावळ तालुक्यातील पाटण ग्रामस्थांना गावातून बाहेर पडताना कसरत करत बाहेर पडावे लागते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केल्याने पाटण ग्रामस्थांसह मळवली व परिसरातील नागरिकांची वाट बिकट झाली आहे.

मागील दोन ते तीन महिन्यांपासून रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी मळवली ते पाटण रस्त्याच्या कडेने जागोजागी खोदकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण झालेली असतानाच आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही नवीन पाइपलाइनच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे.

या खोदकामाचा राडारोडा रस्त्यावर पडला असून वाहन चालकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या रस्त्यावर पाणी साठून डबकी तयार झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण करणे आवश्‍यक होते. मात्र, ऐन पावसाच्या तोंडावर रस्ता दुरूस्ती व पाइपलाइनचे काम सुुरू केल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काम्ब्रे ते कोंडीवडे रस्ताच अपूर्ण
नाणे मावळ – काम्ब्रे ते कोंडीवडे ना. मा. येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असलेला रस्ता अपूर्ण असून त्याचीही दुरवस्था झाली आहे. ६ मार्च २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. तर, २०२५ पर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी होता. मात्र, रस्ताच पूर्ण झाला नसल्याने वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे.

हा रस्ता ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. कोंडीवडे स्मशान भूमीपर्यंत रस्ता अपूर्ण आहे. अपूर्ण असलेल्या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. तर, तयार रस्त्याला रंग रंगोटी केली होती. काही ठिकाणी बोर्ड लावले होते. तेही निकृष्ट दर्जाचे होते. हे बोर्ड खाली पडले आहेत.

रस्त्यावर येणारे-जाणारे प्रवासी, व्यावसायिक, शेतकरी, दुध व्यवसाय, विद्यार्थी यांना या खड्डेमय रस्त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. हा रस्ता कामशेत ते जांभवली या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. रस्त्यात खड्डे असल्याने वाहने घसरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अपूर्ण रस्ता व अतिक्रमण काढून पूर्ण रस्ताची पाहणी करून रस्ते करावेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअतर्गत अपूर्ण रस्त्याची काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.