रूपगंध: बिहारमधील ‘बंगल्यात’ बंड

लोकजनशक्‍ती पक्ष दुभंगला आहे. पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याऐवजी पशुपतीकुमार पारस यांची नेता म्हणून निवड केली. बिहारमधील पासवान समाजाला प्रभावित करणारी व्यक्‍ती यापुढे कोण असेल, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पशुपतीकुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील गट प्रभावी ठरेल की चिराग पासवान प्रभावी ठरतील…

लोकजनशक्‍ती पक्षात ज्या संकटाची शक्‍यता वर्तविण्यात येत होती, ती गोष्ट अखेर घडली आणि नाट्यमय घडामोडी घडून पक्षात उभी फूट पडली. पक्षाच्या सहा खासदारांपैकी पाच जणांनी सध्याच्या संसदीय पक्षनेते चिराग पासवान यांच्याऐवजी रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू खासदार पशुपतीकुमार पारस यांची नेता म्हणून निवड केली. तशी लेखी सूचना लोकसभा सचिवांना पाठविण्यात आली.

लोकसभा सचिवालयाने पशुपतीकुमार पारस यांना लोकजनशक्‍ती पक्षाचे संसदीय पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच चिराग पासवान पक्षात एकाकी पडले आहेत. “बंगला’ हे लोकजनशक्‍ती पक्षाचे निवडणूक चिन्ह असून, बंगल्यात बंड झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

गेल्या वर्षी 8 ऑक्‍टोबरला जेव्हा लोकजनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांचे निधन झाले, तेव्हापासूनच पक्षाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्‍त केली जात होती. लोक रामविलास पासवान यांचे पुत्र आणि युवा खासदार चिराग हे राजकीयदृष्ट्या अपरिपक्‍व असल्याचे मानत होते. रामविलास पासवान यांचे ऐन निवडणुकीच्या काळातच निधन झाले होते. या घटनेचा परिणाम निवडणूक निकालांमध्येही दिसून आला.

पित्याच्या मृत्यूनंतर चिराग यांनी लोकजनशक्‍ती पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली; परंतु बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीदरम्यान त्यांची भूमिका कुणालाच परिपक्‍व वाटली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आपल्या पक्षाला स्थान मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. केंद्रात त्यांचा पक्ष एनडीएच्या सोबत तर ज्या राज्यात पक्षाचे मूळ आहे, अशा बिहारमध्ये मात्र पक्ष एनडीएपासून दूर असा विचित्र विरोधाभास निर्माण झाला होता. त्यांनी नितीशकुमारांच्या संयुक्‍त जनता दलाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले; परंतु भाजपच्या उमेदवारांविरुद्ध दिले नाहीत.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत त्यांनी स्वतःला “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान’ म्हणवून घेतले. भाजपच्या इशाऱ्यावरूनच चिराग हे सर्व काही करत आहेत, अशी चर्चा होत राहिली. निवडणुकीत त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मटिहानीची एकमेव जागा पक्षाने कशीबशी जिंकली. नितीशकुमार यांच्या पक्षाचे नुकसान करण्यात त्यांना जरूर यश मिळाले.

नितीशकुमार 115 जागा लढवून केवळ 43 जागा जिंकू शकले आणि त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे नितीशकुमारांना भाजपने मुख्यमंत्री केले हे खरे; पण त्यांची जादू संपुष्टात आली आहे, हे सर्वांनाच समजून चुकले. चिराग पासवान यांच्याविषयी नितीश यांच्या मनात रोष असणे अत्यंत स्वाभाविक आहे.

चिराग हे एका विचित्र संघर्षाचा हिस्सा बनले आणि अत्यंत हास्यास्पद ठरले. तेव्हापासूनच पुढे काय होईल, याविषयी पक्षातील लोकांमध्ये बेचैनी वाढली होती. बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकजनशक्‍ती पक्षाचा एकेक सदस्य होता. नूतनसिंह हे विधानपरिषदेचे तर राजकुमार सिंह हे विधानसभेचे सदस्य होते. निवडणुकीनंतर एक भाजपमध्ये गेले आणि दुसरे संयुक्‍त जनता दलात! आता तर सहापैकी पाच खासदारांनी चिराग यांच्यापासून वेगळे होत नितीशकुमार यांचा जयजयकार केला आहे.

रामविलास पासवान हे एक परिपक्‍व राजकीय नेते होते. 1969 मध्ये ते विधानसभेचे सदस्य बनले आणि समाजवादी राजकारणाशी जोडले गेले. 1977 मध्ये ते प्रथमच खासदार बनले. 1984 मध्ये ते लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. 1990 मध्ये मंडल आरक्षण आंदोलनाला त्यांनी जोरकसपणे पाठिंबा दिला. 1990 च्या दशकात मागासवर्गात जातिआधारित नवीन समीकरणे तयार होण्यास सुरुवात झाली तेव्हा पासवान जनता दलाचा भाग बनले होते.

2000 मध्ये मागासवर्गीय नेत्यांकडून अपमानित झाल्यामुळे त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला आणि लोकजनशक्‍ती पक्ष असे त्याचे नामकरण केले. थोड्या दिवसांसाठी ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सामीलही झाले; परंतु गोध्रा प्रकरणावरून केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांनी राजीनामा दिला.

2004 मध्ये लालूप्रसाद आणि कॉंग्रेस यांच्याशी आघाडी करून बिहारमध्ये त्यांनी एनडीएला पराभूत करण्यास मदत केली; परंतु वर्षभरातच त्यांचे लालूप्रसादांशी बिनसले आणि 2005 च्या निवडणुकीत त्यांनी 15 वर्षांपासून सुरू असलेली लालूप्रसादांची सत्ता उलथवून लावली. त्यांनी अशी एक ताकद उभी केली, जी लालूप्रसाद आणि नितीशकुमार या दोघांनाही नको होती.

अखेर 2005 मध्ये त्यांचा पक्ष फोडण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. त्यांच्या 29 आमदारांपैकी 21 जणांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी रामविलास पासवान यांना शह दिला. अनेक वर्षे अपमानजनक परिस्थितीतून गेल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा उसळी घेतली आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन आपला पक्ष भाजपशी जोडला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत लालू आणि नितीश यांच्या राजकारणाला एकत्रितपणे धोबीपछाड देण्यात ते यशस्वी झाले. परिणामी, नितीशकुमार व लालूप्रसाद यांना 2015 मध्ये एकत्र येणे भाग पडले.

रामविलास पासवान यांना बिहारचे लोक “राजकारणाची वेधशाळा’ मानत असत. राजकारणाची नेमकी नाडी त्यांनी पकडली होती. राजकीय हवामानाचा ते अचूक अंदाज वर्तवत असत. रामविलास पासवान असे म्हणत असत की, “”एक तर तुम्ही डावीकडून जा किंवा उजवीकडून चाला. मधून चालाल तर तुम्ही चेंगरले जाल.” त्यांची ही शिकवण दुर्दैवाने त्यांच्या मुलानेच अंमलात आणली नाही.

परिणामी, आता लोकजनशक्‍ती पक्षात जी फूट पडली आहे, तिचा बिहारच्या राजकारणावर काय परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की, या सर्व घडामोडींमागे नितीशकुमारांचा हात आहे. 2005 मध्येही लोकजनशक्‍ती पक्ष फोडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती आणि फुटलेले सर्व 21 आमदार नितीशकुमारांनाच जाऊन मिळाले होते. परंतु पुन्हा एकदा तसेच घडणार का? तसे घडण्याची शक्‍यता फारच कमी मानली जाते.

सध्या राजकारणात विचारशून्यतेची स्थिती वाढत चालली असताना जाती आणि धर्माचे मुद्दे स्वाभाविकपणेच महत्त्वाचे झाले आहेत. लोकजनशक्‍ती पक्षाचा प्रभाव मुख्यत्वे पासवान जातीच्या मतदारांमध्ये दिसून येतो. हा एक लढाऊ समाज मानला जातो.

इतिहासही तशी साक्ष देतो. 1757 च्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या निर्णायक विजयात क्‍लाइव्हच्या सैन्यातील पासवान सैनिकांचे मोलाचे योगदान होते असे मानले जाते. पासवान समाजाला प्रभावित करणारी व्यक्‍ती यापुढे कोण असेल, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पशुपतीकुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील गट प्रभावी ठरेल की चिराग प्रभावी ठरतील, हा तो प्रश्‍न होय. या समुदायावर चिराग यांचाच प्रभाव पडणार का हे पहाणे औस्युक्‍याचे ठरेल.

– संगीता चौधरी