आरटीई प्रवेश : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुविधा उपलब्ध; वाचा संपूर्ण माहिती….

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भ्ररण्यासाठी पालकांना मंगळवार (दि.१६) पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे अनेकदा शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली.

यंदा राज्यातील एकूण ७५ हजार ९७४ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी ९ लाख ७२ हजार ८२३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ५ हजार १५३ शाळांनी नोंदणी केली असून त्यात ७७ हजार ९२७ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.

यंदा आरटीई कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता.

आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आता अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळा ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करावयाची असल्यास पालकाच्या प्राधान्य क्रमानुसार संबंधित शाळा निवडता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल आणि एक किलोमीटरच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीतच त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

‘सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकाकरिता २५ टक्के आरक्षित जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया येत्या ३० एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे’.

– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ

https://student.maharashtra.gov.in/adm_portal