पुणे | आरटीई अर्ज नोंदणीची प्रक्रिया आठवडाभरात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तयारीही सुरू केली आहे.

आरटीई कायद्यात झालेल्या बदलामुळे सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्येसद्धा आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा आरटीईच्या २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांची संख्या वाढली आहे. यंदा राज्यातील ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २०३ जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत.

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांना लवकरच आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षांपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा अंतर्भाव केला जाणार आहे.

आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेक पालक इच्छुक आहेत. विद्यार्थ्याच्या रहिवास परिसरात सरकारी शाळा असताना आरटीईतून विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिल्यास संबंधित शाळेला शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. लवकरच या शाळा आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत.

राज्यात आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी प्रवेश क्षमता यात वाढ झाल्याचे दिसून येत असले, तरी सर्व प्रवेश हे शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळांमध्येच होण्याची शक्यता आहे. विविध पालक संघटनांनी या प्रक्रियेस विरोध केला असला, तरी शासनाकडून त्याची गांभीर्याने दाखलच घेतल्याचे दिसत नाही.