रूपगंध : हा खेळ भावनेचा

आयुष्यात आपण अनेक निर्णय खरेच विचार करून घेतो की भावनेच्या भरात घेतो? कोणी आपल्याला भावनेच्या मोहपाशात अडकवू पाहात असेल तर? या व अशा प्रश्‍नांविषयी थोडेसे…

कोणताही प्राणी जिवंत आहे म्हणजेच त्याला भावना आहेतच. भावना आहेत म्हणजे भावनिक गुंता हा निर्माण होणारच. या भावनिक गुंत्यात आपण कधी अगदी गुरफटून जातो. तर कधी आपण निष्ठूर होतो. आपल्या भावनांची कदर इतर कोणी कधी करीत नाही तर आपण कधी इतरांच्या भावनांची कदर करीत नाही. या व अशा अनेक आपल्या भावनांच्या भिन्न छटा आहेत. आपण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो हे या मागे आपल्या आलेले आधीचे अनुभव, त्यावेळची आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक अवस्था या व अशा इतर अनेक घटकांवर अवलंबून असते.

सध्या सर्वच क्षेत्रात यांत्रिक पद्धतीने कामे होत आहेत. संगणकही आता माणसाप्रमाणे विचार करू लागलेला आहे. यंत्र हे कित्येक तास सलग कोणतीही तक्रार न करता काम करू शकते. रात्री बेरात्री काम करू शकते. माणसाचे तसे नाही. माणूस थकतो, कामाचा मानसिक ताण येतो कारण माणसाला भावना आहेत. आपण आपल्या शरीराला यंत्राप्रमाणे वापरायचे नाही; नव्हे, वापरूच शकत नाही! आपण शरीराला यंत्राप्रमाणे वापरण्याचा प्रयत्नही करावयाचा नाही. आपल्याला भावना असल्याने केवळ सजीवच नव्हे तर आपण यंत्रालाही भावना आहेत समजतो. आपली सायकल, गाडी वगैरे आपण जीवापाड जपत असतो.

आपण आपल्या यंत्राकडून काम करून घेतच असतो. यंत्रामध्ये थोडा काही बिघाड झाला तरी आपण लगेच दुरुस्त करतो. यंत्राला वेळच्या वेळी तेल-पाणी करत असतो. असेच आपण आपल्या भावना, आपले मन यांचेही वेळच्या वेळी तेल-पाणी करायला हवे. आपल्या तसेच इतरांच्याही भावना सांभळायला हव्यात. मैत्री, नातेसंबंध टिकवून ठेवायला हवेत. कोणाशी संबंध तोडणे हे खूप सोपे आहे. एवढेच काय एखाद्याला मग तो कितीही ताकदीचा असो, त्याला दोन रट्टे मारणेही सोपे आहे, पण संबंध तोडून, कोणाला रट्टे मारून प्रश्‍न सुटत असते तर… भावनिक गुंता हा अगदी हळुवारपणेच सोडवावा लागतो आणि आपण “हे बंध रेषमाचे’ अगदी अलगदपणे सोडवायचे आहेत.

आपल्याला भावना आहेत हे लक्षात घेऊन आपण इतरांच्याही व आपल्या भावनांचा आदर राखला पाहिजे. आपल्या भावना दुखावल्या जातात अशा वेळीही आपण मानसिकदृष्ट्या तणावात येतो. अशा वेळी आपणच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आपले मनोबल ढळू द्यावयाचे नाही. बऱ्याच वेळा आपण भावनेचा विचार करून काही निर्णय घेतो, पण तो चुकीचा असू शकतो. म्हणून भावनात्मकदृष्ट्या विचार करून निर्णय न घेता व्यावहारिक दृष्ट्या विचार करून निर्णय घ्यावा. बऱ्याचवेळा भावनिक गुंता आपल्या आयुष्यात एवढा मोठा होऊन जातो की, आपल्याला माहीत असते की चुकीचा निर्णय आहे तरी आपण चुकीचाच निर्णय घेतो.

याच भावनिक गुंत्याची दुसरी बाजू म्हणजे कोणीतरी आपल्याला भावनिकदृष्ट्या त्यांच्या मोहपाशात अडकवायला पाहात असते. अशा वेळी “नाही’ किंवा “हो’ म्हणणे हे आपल्याला मुश्‍कील होऊन जाते. याही परिस्थितीत समोरची व्यक्‍ती आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडते. येथे आपण भावनेला दोन दृष्टिकोनातून बघतो आहोत पहिला म्हणजे आपण कोणामध्ये तरी भावनिकदृष्ट्या गुंतलेलो असतो. दुसरा म्हणजे कोणीतरी आपल्याला भावनिक जाळ्यात, मोह पाशात अडकवायला पहात असतो.

चुकीचा निर्णय घेण्यासाठी कमी कालावधी लागतो, पण बऱ्याच प्रसंगी त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. येथेच आपण आपले मानसिक संतुलन ढळू न देता आपल्या मनावर पूर्णपणे आपलाच ताबा ठेवून आपण व्यावहारिकदृष्ट्या योग्य तोच निर्णय घ्यावा.
कधी असेही होते की भावनिकदृष्ट्या घेतलेला निर्णयही योग्यच असतो. एकदा आमच्या ओळखीच्या असलेल्या बाई घर बांधण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यासाठी म्हणून भावाकडे कोलकाता येथे आगगाडीने गेल्या. माहेरी जाताना त्यांनी त्यांचे दागिनेही बरोबर घेतले. पण प्रवासात त्यांच्या सामानाची चोरी झाली, त्यात त्यांचे पैसे व दागिने दोन्हीही गेले. झाला प्रकार त्यांनी भावाला सांगितला.

भावाने चुटकीसरशी प्रश्‍न सोडविला. त्यांच्या भावाने बहिणीला सांगितले, “”माझे पैसे मला मिळाले. राहिला प्रश्‍न दागिन्यांचा. तुझ्या लग्नात ज्या सराफाकडून दागिने घडवून घेतले त्याच वजनाचे तसेच दागिने मी पुन्हा घडवून देतो.” परत आल्यावर नवऱ्याला त्या बाईंनी सांगितले की भावाला पैसे दिले आहेत. नवऱ्याला खरा काय प्रकार घडला होता हे समजायला पुढची दहा वर्षे लागली. पण हेच त्या भावाने जर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला असता आणि पैसे मागितले असते व दागिनेही घडवून दिले नसते तर बहिणीपुढे फारच मोठा बिकट प्रश्‍न निर्माण झाला असता. येथे त्याभावाने पैशांचा विचार न करता बहिणीच्या आयुष्याचा विचार करता भावनिकदृष्ट्या घेतलेला निर्णयही योग्यच होता.

आपण आपली सद्‌सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून व्यावहारिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या जो कोणता योग्य निर्णय असेल तोच घ्यावा. याचसाठी आपले मानसिक संतुलन आपण चांगलेच ठेवले पाहिजे. हा भावनेचा खेळ खेळताना आपल्याला व दुसऱ्याला भावनिक दुखापत होऊ द्यायची नाही. मनाला पोहोचलेली ठेच ही फारच खोलवर जखम करून जाते. या भावनेच्या खेळातून आपल्याला व इतरांनाही आनंद मिळाला पाहिजे ना की ठेच एवढी काळजी आपण घ्यायची म्हणजे झाले.

आपण बऱ्याच वेळा एकतर्फी प्रेमातून एका व्यक्‍तीने दुसऱ्या व्यक्‍तीवर हल्ला केल्याचे बऱ्याच वेळा वाचले, ऐकले असेल. असा हल्ला करणाऱ्या व्यक्‍ती दुसऱ्या व्यक्‍तीवर अधिकार गाजवू पाहात असतात. प्रश्‍न असा असतो की दुसरी व्यक्‍ती तो अधिकार मान्य करत आहे का? जर मान्य नसेल तर त्या व्यक्‍तीच्या भावनांचा आदर राखला पाहिजे. पण असे न होता केवळ स्वतःच्याच भावनांचा विचार करून आपल्या भावना व विचार दुसऱ्या व्यक्‍तीवर लादून प्रेम कृत्रिमपणे करता येत नाही आणि दुसऱ्या व्यक्‍तीचे प्रेम मिळविताही येत नाही, हे विसरून चालणार नाही.

आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्या मनोदेवतेची आराधाना करावयाची आहे. आपल्या अशा अराधनेचे पुष्प मनोदेवतेला अर्पण केल्यावर मनोदेवता आपल्यावर प्रसन्न होऊन योग्य ती दिशा दाखवून आपल्याला आशीर्वाद देणार आहे.

– अनिकेत भालेराव