साहाची निवड न होणे महागात पडेल; कुंबळेने दिला बीसीसीआयला इशारा

मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची निवड न केल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसणार आहे, असा इशारा माजी कर्णधार अनील कुंबळे यांनी दिला आहे. लोकेश राहुल जायबंदी असल्याने ईशान किशनची निवड केली गेली. मात्र, त्याच्यापेक्षा फलंदाजीतच नव्हे तर यष्टीरक्षणातही सरस आहे व त्याने ते सातत्याने सिद्धही केले आहे, असेही कुंबळे यांनी म्हटले आहे.

राहुलसह श्रेयस अय्यर, जयदेव उनाडकट हे देखील दुखापतींनी त्रस्त असल्याने बीसीसीआयने सुधारित संघ घोषित केला व त्यात राहुलच्या जागी ईशानची निवड केली. तसेच तीन राखीव खेळाडूही निवडले; परंतु जर यष्टीरक्षणाचा निकष असेल तर साहा जास्त सरस आहे. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून सलामीला फलंदाजीला येत नव्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी केली आहे. त्याच्याकडे जर ती क्षमता आहे तर त्याला संधी का डावलली गेली, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

भारतीय संघाला या स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार असून या सामन्यासाठी एक दिवस राखीवही ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी भारतीय संघाचा पराभव करत न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले होते.

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्‍सर पटेल, के. एस. भरत, शार्दुल ठाकूर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट (तंदुरुस्तीवर निश्‍चित होणार). राखीव खेळाडू – सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार.