भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यावर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी 15 ते 20 एप्रिलदरम्यान होणार असून सायनाने का माघार घेतली याचे उत्तर भारतीय बॅडमिंटन संघटनेकडेही नसल्याने संभ्रम वाढला आहे. सायनाने केवळ पत्र लिहून संघटनेला या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. त्यामागे खरे काय कारण आहे ते मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच उबेर चषक या स्पर्धांकरता भारतीय संघात निवड होण्यासाठी ही एकमात्र निवड चाचणी स्पर्धा असतानाही सायनाने माघार घेतल्याने सध्या आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. सायनाने भविष्याबाबत काही निर्णय घेतला आहे का व तो काही दिवसांतच जाहीर केला जाणार आहे का याबाबतही सध्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.