सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार? राज्य सरकारचे स्पष्टीकरण

पुणे – लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. सरकारच्या पुढील निर्णयाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोशल मीडियावर बुधवारपासून राज्य सरकारच्या नावे काही अधिसूचना व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये सलून, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणांवर व्यायामांना परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आता राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले असून अशी कोणत्याही अधिसूचना किंवा आदेश दिलेले नसल्याचे म्हंटले आहे.

राज्य सरकारने व्हायरल झालेल्या अधिसूचना ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना राज्य शासनाने जारी केलेल्या नाहीत. सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि इतर सुविधा २९ मे पासून सुरु होणार नाहीत. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना खोट्या असून त्या पुढे फॉरवर्ड करु नका, असे आवाहनही राज्य सरकारने केले आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

राज्यातील रेडझोनसह सर्व भागातील मॉल्स आणि कॉम्प्लेक्‍स वगळता अन्य ठिकाणची 33 टक्‍के दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कटिंग सलून आणि ब्यूटीपार्लरही काही अटींसह मान्यता देण्यात आली आहे.

त्याचबरोबर बागा, क्रीडांगणे, फुटपाथवर व्यायाम करण्यास सकाळी 5 ते सायं. 7 या काळात मान्यता देण्यात आली आहे. मात्र कोणतीही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment