Samsung मोबाईलची विक्री वाढणार; कंपनी आणतेय जबरदस्त प्लॅन

चेन्नई – सेमीकंडक्‍टर आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सॅमसंग कंपनीने याबाबत परिस्थिती पूर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे कंपनीच्या भारतातील उत्पादनावर कसलाही परिणाम झालेला नाही, असे या कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सॅमसंग कंपनीचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग कंपनीचा वाटा तब्बल 25 टक्के आहे. आता कंपनीने गॅलक्‍सी ए या प्रकारातील नवी मॉडेल सादर केल्यामुळे आगामी काळात कंपनीची विक्री वाढण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील नागरिकांना पुर्ण रोख रक्कम देऊन फोन खरेदी करता येत नाही. यासाठी सॅमसंग फायनान्स प्लस या यंत्रणेच्या माध्यमातून फायनान्सिंग पर्यायावर विचार करीत असल्याचे ते म्हणाले. भारतामध्ये स्मार्टफोन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्याचबरोबर भारतातील ग्राहक चिकित्सक आहे.

मात्र आमची उत्पादने आणि किंमत योग्य असल्यामुळे आम्ही भारतीय बाजारपेठेमधील आपले स्थान कायम ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी झालो आहोत. भारतीय ग्राहकांच्या गरजा ओळखून आम्ही उत्पादनात योग्य वेळी योग्य ते बदल करीत असल्यामुळे आमची उत्पादने यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.