पुणे जिल्हा | संदीप हरियाणा ठरला आळे केसरी

बेल्हे,(वार्ताहर) – आळे केसरी 2024 च्या मानाच्या गदेचा मानकरी संदीप हरियाणा ठरला. त्याने अंतिम कुस्ती स्पर्धेत आकाश चव्हाणचा पराभव करीत 25 हजार रुपये व मानाची चांदीची गदा पटकावली.

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या श्रीक्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथील रेडा समाधी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची यात्रा अतिशय उत्साहात पार पडली असून यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

चार दिवस चाललेल्या या यात्रेत शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर भव्य पालखी सोहळा, भजन महोत्सव, तुकाई माता विठ्ठल भक्त प्रासादिक भजन, भारूड मंडळाचा भारूडाचा कार्यक्रम तर पांडुरंग महाराज घुले, विशाल महाराज हाडवळे, सुदाम महाराज बनकर यांची कीर्तने झाली. तर यात्रेच्या तिसर्‍या दिवशी कुस्त्यांचा आखाडा रंगला.

विशेष म्हणजे मानाच्या गदेसाठी झालेल्या लढतीसाठी 8 पैलवान निवडण्यात आले होते व या आठमधून चार कुस्त्या झाल्या परत चार विजेत्यांमध्ये दोन कुस्त्या झाल्या व या दोनमधून शेवटची मानाची लढत झाली. या लढतीसाठी मानाची गदा कै. बबन कमलाकर भुजबळ यांच्या स्मरणार्थ संतोष भुजबळ व सुभाष भुजबळ यांच्याकडून देण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लेंडे, दिलीप कोल्हे, शाम माळी, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच अ‍ॅड. विजय कु-हाडे, आळेफाटाचे पोलीस निरीक्षक सतीष होडगर, सहायक निरीक्षक सुनील बडगुजर, रागिणी कराळे, अनिल पवार, अशोक फलके, नवनाथ निमसे,दिनेश सहाने, मंगेश काकडे, तुषार सहाणे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कुस्ती आखाड्यात 250 लहान मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.

विशेष आकर्षण ठरले ते मुलींची रोमहर्षक कुस्त्या. या मुलींनी उपस्थितांची प्रेक्षकांची मने जिंकली. महिलांच्याही अटीतटीच्या लढती झाल्या. यावेळी समालोचन, निलेश भुजबळ, जीवन शिंदे, निलेश शिंदे, उदय पाटील भुजबळ, यांनी केले तर पंच म्हणून गोपीचंद मेहेर, संजय भुजबळ, पप्पू डोंगरे, सुभाष डोके यांनी काम पाहीले.