अंबादास दानवेंबरोबरच्या राड्यानंतर संदीपान भुमरे म्हणाले,”विरोधी पक्षनेत्याच..”

औरंगाबाद : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीत हे दोन नेते एकमेकांच्या समोर आले होते. या दोन्ही नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दोनही नेत्यांच्या या राड्यानंतर संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या आरोपाला खोडून काढले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, इथं ठाकरे गट वगैरे असं काही नाही. इथं तालुका धरला जातो. तालुक्याला किती निधी दिला ते पाहा असं भुमरे यावेळी म्हणाले. इतर तालुक्यांना दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिला आहे.सगळ्या तालुक्यांना सारखा निधी देण्यात आला आहे. इथे उदयसिंह राजपूत, ठाकरे गट असा काही विषय नसल्याचे देखील यावेळी भुमरेंनी स्पष्ट केले.

बैठकी दरम्यान दोन्हही नेत्यांचा आवाज वाढला होता. बैठकीवेळी अंबादास दानवे यांना आवाज का वाढवावा लागला? असा प्रश्न प्रसारमाध्यमंच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर विरोधी पक्षनेत्याचं ते कामच आहे असं मत संदीपान भुमरेंनी व्यक्त केलं.