संगमनेर, राहाता, अकोले भाजपकडेच : खा. विखे

संगमनेर – संगमनेर, अकोले व राहाता हे तीन विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे असले तरी या मतदारसंघ भाजप दावा करून पक्षाचे उमेदवार देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुढील आठवड्यात नगर जिल्ह्यात येत आहे.

25 ऑगस्ट रोजी संगमनेर व अकोले शहरात मुख्यंमत्र्यांची सभा होणार असल्याने या सभाच्या नियोजनासाठी डॉ. विखे यांच्या उपस्थितीत श्रमिक मंगल कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यंमत्र्यांमुळेच रखडलेल्या निळवंडे कालव्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागला. कालव्यांची कामे सुरू असून एका वर्षात हक्काचे पाणी लाभक्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे.

अकोले तालुक्‍यातही कालव्यांची कामे सुरू असून राहाता तालुक्‍यातही कालव्यांच्या कामाचे भुसंपादनाचे काम पुर्ण झाले. मात्र, संगमनेर तालुक्‍यातील घुलेवाडी येथील भुसंपादनाचे काम बाकी आहे. त्यामुळे येथील नेतृत्वाने ते काम करावे. राहाता, संगमनेर, अकोले हे मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातही भाजपचा उमेदवार असून तो विखे पाटील ठरवतील. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील.

संगमनेरात मॅनेज झालेल्या उमेदवाराला तिकीट मिळणार नसून विखे ठरवतील तोच उमेदवार निश्‍चित होईल. सर्वसामान्य उमेदवार प्रस्थापितांविरोधात लढत देऊ शकतो. असा इतिहास आहे. अनेक प्रस्थापितांचा पराभव सामान्य उमेदवारांनी केला असून संगमनेरमध्ये देखील ते घडू शकते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांचा देखील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर प्रदेशाध्यक्ष काय? असेही डॉ. विखे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था बिकट असून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेत्यांना यात्रा काढावी लागली. यापेक्षा मोठे दुर्देव काय? त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असेही विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment