Sanjay Raut : “प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी, प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरु” – संजय राऊत

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लोकसभेच्या जागावाटपावरून मागच्या काही दिवसांपासून मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेसविषयी न बोलता पुन्हा एकदा भाजपावर  टीका केली. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उदघाटन होणार असून भाजपाने यासाठी देशभरात जोरदार तयारी केली आहे.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत  यांनी, “भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी आहे. एवढे प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे.” असे म्हणत भाजपवर सडकून टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या जागा वाटपावर संजय राऊत यांनी  काँग्रेसवर  केली होती. मात्र आज  काँग्रेसविषयी मवाळ भूमिका घेत, “माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले. त्यासोबतच “महाविकास आघाडीतील तीनही पक्षात योग्य ताळमेळ आहे. आमच्यात मतभेद असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यात काहीही तथ्य नाही. मविआत जागावाटपावरून कोणतीही धुसफूस नाही. आमच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांचे वाटप मेरिटनुसारच होईल. जिंकेल त्याची जागा, हे आमचे सूत्र आधीपासूनच आहे. आकडा वाढविण्यासाठी म्हणून जागा द्यायच्या नाहीत”, असे म्हणत संजय राऊत यांनी माविआमध्ये सारकही आलबेल असल्याचे सांगितले.

त्यासोबतच संजय राऊत यांनी, “शिवसेनेचे सूत्र राहिले आहे की, आम्हाला २३ जागा मिळाल्या पाहीजेत. त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. एखाद्या जागेवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असू शकतो. तेव्हा त्या जागेवर नक्कीच त्यांचा विचार होऊ शकतो. एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल, त्यावरही चर्चा होऊ शकते.” तसेच “काँग्रेस शून्य आहे, असे मी कधीही म्हणालो नाही. काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही, असे मला म्हणायचे होते. आमच्याकडे १८ खासदार होते, त्यातील काही गेले आणि सहा बाकी आहेत. राष्ट्रवादीकडे चार-पाच खासदार होते, त्यातील एक-दोन निघून गेले. पण काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही. पण आम्ही एकत्र लढून महाराष्ट्रात जवळपास ४० जागा जिंकू शकतो, एवढी आमची ताकद आहे”,  असे वक्तव्य संजय राऊत यांनी  केले.

तसेच काँग्रेस नेते संजय निरुपम  यांच्या शिवसेनेविषयीच्या विधानावर संजय राऊत यांनी, “त्यांना काहीही बोलू द्या. पण आमच्याकडे आज सहा खासदार आहेत आणि आम्ही पूर्वीच्या आमच्या आकड्यावर पोहचू शकतो. आम्ही जिंकू शकत नाही, तर तुम्हीही जिंकू शकत नाही. आज देशात असा कोणताही पक्ष नाही, जो स्वबळावर जिंकू शकतो. भाजपालाही जिंकण्यासाठी ईव्हीएम हवे आहे. त्यांची आघाडी ईव्हीएमशी आहे. ईव्हीएमशिवाय ते जिंकू शकत नाही. त्यांनी बॅलेटपेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी. निवडणूक जिंकण्यासाठी कुणाला ईव्हीएम हवे आहे तर कुणाला आघाडीतील सहयोगी. त्याशिवाय जिंकणे अवघड आहे.”असे म्हटले.