“आत्ता निवडणूका घ्या चोर कोण आणि शोर कोण स्पष्ट होईल” मोर्चातून संजय राऊत यांचं शिंदे फडणवीस सरकारला आव्हान

मुंबई – राज्यात सत्तांतराला वर्षपूर्ती झाली असून महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळपासून सगळ्यांना चिंता होती पावसामुळे या मोर्चाच काय होईल मात्र सूर्य उगवला आहे आणि याठिकाणी शिवसैनिकांचा पाऊस पडला आहे. असं संजय राऊत यावेळी म्हणाले. बजरंबली कर्नाटकात मोदींना पावला नाही पण इथं आदित्य ठाकरेंना पावला असा टोला देखील यावेळी राऊतांनी लगावला. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका देखील शिवसेनेच्या बापाची आहे. बाळासाहेबांनी मुंबईच्या पालिकेवर भगवा फडकवला हा उतरवण्यासाठी दोन बोके आणि ४० खोके काम करत आहेत अशी टीका देखील यावेळी राऊत यांनी केली.

चोर मचाये शोर.. असं म्हणणाऱ्यांना राऊत म्हणाले आत्ता निवडणूक घ्या चोर कोण आणि शोर कोण हे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल फक्त निवडणुका घ्या असं आव्हान यावेळी राऊत यांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला दिल.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी अंबादास दानवे,चंद्रकांत खैरे यासह संजय राऊत असे अनेक नेते उपस्थित होते. पाऊस सुरु असताना देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. चाळीस बोके ५० खोके मुंबईसाठी नॉट ओके अशा अनेक घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

मुंबईकरांसह मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाल्याचे पाहायला मिळाले. मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय अशा मार्गाने या मोर्चाने मार्गक्रमण केले. यावेळी आदित्य ठाकरे रस्त्याने चालताना दिसले तर इतर नेते मुख्यालयाबाहेरील स्टेजवर दिसून आले.

मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. यामुळेच आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी म्हंटले.