Sanjay Singh : “नवीन समिती अन् माझे निलंबन मला अमान्य, लवकरच…” ; क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात संजय सिंह आक्रमक

Sanjay Singh :  भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह हे निवडून आले होते, मात्र त्यांच्या निवडीला होणाऱ्या विरोधाला पाहून सरकारने एक पाऊल मागे टाकत त्यांची निवड आणि नव्याने तयार करण्यात आलेली कुस्ती महासंघाची कार्यकारणी रद्द केली होती. ही कारवाई करताना संजय सिंह यांच्यावर नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप क्रीडा मंत्रालयाने केला होता. दरम्यान आता मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात संजय सिंह आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संजय सिंह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाविरोधात शड्डू ठोकला आहे. याविषयी बोलताना  संजय सिंह यांनी, “भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमलेली अ‍ॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) मी मानत नाही. तसेच क्रीडा मंत्रालयाने केलेले निलंबन मला मान्य नाही.” अ‍ॅड हॉक समितीने जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (नॅशनल चॅम्पियनशिप) आयोजित करणार असल्याची घोषणा केल्यानंतर संजय सिंह यांनी , “आम्ही (कुस्ती महासंघ) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजन करणार  असल्याचे म्हटले आहे.

तसेच याविषयी बोलताना संजय सिंह यांनी, “ऑलिम्पिक असोसिएशनने केलेले निलंबन मला मान्य नाही. आमचा कुस्ती महासंघ सुरळीतपणे काम करत आहे. आम्ही स्वतःच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. आम्ही इथे असताना तटस्थ समिती या स्पर्धेचं आयोजन करू शकत नाही. तसेच वेगवेगळी राज्ये त्यांचे संघ पाठवणारच नसतील तर हे लोक (अ‍ॅड हॉक कुस्ती समिती) स्पर्धा कशी आयोजित करणार. आम्ही लवकरच कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावणार आहोत. त्यानंतर आम्ही कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावर चर्चा करून अधिकृत घोषणा करू.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर तीन दिवसांनी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी बरखास्त केली. त्यापाठोपाठ चार दिवसांनी कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी तीन सदस्यीय अ‍ॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) गठित केली. भूपेंद्र बाजवा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर माजी बॅडमिंटनपटू मंजूषा कंवर आणि एमएम सोमाया हे या समितीतले सदस्य आहेत. कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष (संजय सिंह) आणि त्यांच्या जुन्या-नव्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांमुळे रेसलिंग फेडरेशनच्या घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केले आहे. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या तत्त्वांच्या विरोधात स्वतःची मनमानी करत काही निर्णय घेतले होते. त्यामुळेच ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी बरखास्त केली, संजय सिंह यांना निलंबित केलं, तसेच नव्या कार्यकारिणीने तीन दिवसांत घेतलेले सर्व निर्णय रद्द केले आहेत.