पुणे जिल्हा | जलजीवनबाबत सरपंचांनी विशेष दक्षता घ्यावी

पळसदेव, (वार्ताहर) -सरपंच ग्रामसेवकांनी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू असताना कामाच्या दर्जाबाबत दक्षता घेतल्यास या योजनेची कामे दर्जेदार होण्यास मदत होईल. सरपंचांनी गावाच्या पुढील तीस वर्षांच्या भविष्याचा विचार करून हस्तांतरानंतर योजना योग्य नियोजन करून व्यवस्थित चालवल्यास या योजनेचा हेतू सध्या होईल व नागरिकांना शुद्ध पाणी नियमित प्यायला मिळेल.

त्यामुळे सरपंचांनी या योजनेबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गट विकास अधिकारी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरीच्या प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले .

बोरमलनाथ सभागृह बोरीपार्धी या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरी यांच्या वतीने तीन दिवसीय जलजीवन मिशन योजना हस्तांतरण व देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रणोती श्रीश्रीमाळ बोलत होत्या.

वेळी आयोजित तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिरात यशदाचे प्रवीण प्रशिक्षक रामदास पवार, बिस्मिल्ला सय्यद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रशिक्षण कार्यक्रमात पाणी पुरवठा योजना हस्तांतरण प्रक्रिया, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी आकारणी, योजनेचे काम करणार्‍या ठेकेदाराची जबादारी, नागरिकांचा लोकसह्भाग, शासकीय योजनांचे अभिसरण, शाश्वत स्रोत या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणात सरपंच, ग्रामसेवक व पाणी पुरवठा कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते. या वेळी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, विस्तार अधिकारी संजय भोरे, विस्तार अधिकारी पांडुरंग आटोळे, संभाजी कोळपे, संदीप लांडगे, ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर सह सरपंच, ग्रामसेवक सह पाणी पुरवठा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

पुढील 30 वर्षांचे नियोजन
देशातील सर्व नागरिकांना डिसेंबर 2024पर्यंत नळाद्वारे शुद्ध, नियमित, आणि पुरेसे पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून जल जीवन मिशन योजना संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. ही योजना पुढील किमान 30 वर्षे व्यवस्थित चालावी यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता कमिटीतील अध्यक्ष सचिव व सदस्य यांची क्षमता बांधणी करण्यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.