सातारा – भुईंज व दरेच्या आरोग्य केंद्रासाठी दोन कोटी निधी

वाई – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाई तालुक्यातील भुईज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी व महाबळेश्वर तालुक्यातील दरे उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधणे या कामांसाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

यामध्ये भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील विद्युतीकरण, पेव्हर ब्लॅाक बसविणे, पार्किग शेड तसेच फर्निचर करणे यासाठी एक कोटी तर डोंगराळ भागातील दरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत बांधणे यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

लोकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्याकडे सातत्याने पाठपुरावा राहिला असून लोकांच्या आरोग्यासाठी पुढील काळातही चांगल्या सुविधा कायमस्वरूपी उभ्या राहाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची व उपकेंद्राची कामे लवकरच सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.