सातारा | विस्थापितांच्या एकत्रीकरणासाठी राज्यव्यापी दौरा करणार

सातारा – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या संक्रमणाची वेळ आहे. चांगल्या दर्जाचे व विचारांचे तरुण राजकारणात यायला पाहिजेत. मात्र, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. राजकारणातली नैतिकता संपत चालली आहे. वाडा विरुद्ध गावगाडा अशी राज्यात तीव्र नाराजी आहे. राजकारणाच्या प्रवाहात विस्थापितांचे शोषण होत आहे, अशा विस्थापितांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रभर लवकरच दौरा करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुलढाणा येथून तुपकर साताऱ्यात रात्री उशिरा दाखल झाले. येथील मुक्तांगण भवनामध्ये त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्हा चळवळींचा आहे. या चळवळींनी जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला गती दिली. मात्र, आजच्या राजकारणामध्ये वैचारिक चळवळीसह तरुण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत.

राजकारणाचा ट्रेंड सध्या बदलतोय. राजकारण प्रस्थापितांचे बनले असून राज्यातील राजकारणांविषयी सामान्य जनतेच्या मनात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी दूर करून समाजातील विस्थापितांची मोट बांधण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात बुलढाणा येथून करणार असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रदेशनिहाय दौरा होणार आहे. या दौऱ्यामध्ये चांगल्या विचारांचे तरुण पुढे आणून त्यांना राजकारणात सक्रिय करणे आणि शेतकरी व तरुणांचे प्रश्न घेऊन वैचारिक चळवळी वृद्धिंगत करणे हा मूळ हेतू असल्याचे तुपकर यांनी सांगितले. विदर्भामध्ये कापूस व सोयाबीन तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस दर हे प्रश्न दरवर्षी गंभीर होतात. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. यामध्येसुद्धा प्रस्थापितांचे राजकारण आडवे येते, हे प्रश्न घेऊन सरकारला रोखठोकपणे जाब विचारला जाणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांची वोट बँक उभारली जात नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिशा देणे हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. असे राजकारण होत नाही. शेतकरी जागरूक करणे आणि राज्य सरकारवर दबाव टाकणारा शेतकऱ्यांचा दबाव गट तयार करणे हे आमच्या चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले .

विजय माझ्या बाजूने – तुपकर
साखर पट्ट्यामध्ये राजकारणाची दिशा बदलते आहे. सर्वसामान्य माणूस विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा घडवत मी मतदारराजाचा शंभर टक्के कौल मिळवला असेल, या निवडणुकीत लोकांनी मला वर्गणी काढून उभे केले. त्यामुळे विजय माझ्या बाजूने असेल, असा दावा रविकांत तुपकर यांनी केला.