सातारा : सूर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई

ओगलेवाडी परिसरातील तीन जणांचा समावेश
कराड :
कराड शहर आणि परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबर दुखापत, जबरी चोरी, विनयभंग, खंडणी, अवैधरित्या शस्त्रे बाळगणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सोमा उर्फ सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय 33), रविराज शिवाजी पळसे (वय 27) आणि आर्यन चंद्रकांत सूर्यवंशी (वय 19, तिघे रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कराड) या टोळीवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करून, संघटितपणे गुन्हे करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला होता. दुर्गादेवी उत्सवाची वर्गणी दिली नाही, म्हणून ओगलेवाडी परिसरातील सोमा सूर्यवंशी, रविराज पळसे, आर्यन सूर्यवंशी यांनी एकास शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्याच्यावर कोयत्याने व बिअरच्या बाटलीने प्राणघातक वार केले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या तिघांनी दहशत निर्माण करून, आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते.

तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करून, त्यांच्यावर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला होता. फुलारी यांनी या टोळीवरील गुन्ह्यांची आणि पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून, या गुन्ह्यात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाईस मान्यता दिली होती. याचा तपास पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पतंग पाटील, संजय देवकुळे, हवालदार अमित सपकाळ, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

दीड वर्षात 112 जणांवर कारवाया
जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे करणार्‍या 112 जणांवर नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत नऊ प्रस्तावांद्वारे ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरेबर 58 जणांवर तडीपारीची आणि एकावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.