सातारा : अॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्या निवडीने पुरस्काराची उंची वाढली

चंद्रकांतदादा पाटील; इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
सातारा –
स्वतःचा संसार व वकिली सांभाळून इस्माईलसाहेब मुल्ला यांनी एक रुपया मानधन न घेता वर्षोनी वर्षे काम केले. त्याच तोलामोलाच्या आशुतोष कुंभकोणी यांना आज रयत शिक्षण संस्थेतर्फे पैगंबर इस्माईलसाहेब मुल्ला गौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. ज्यांना आपण नमस्कार करायला पाहिजे त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. अॅड .आशुतोष कुंभकोणी यांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली ’ असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ पुरस्काराचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, कायदे सल्लागार दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी शासनाच्या विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये योग्य बाजू मांडल्यामुळे शासनाच्या बाजूने निकाल लागले आहेत. त्यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना स्वर्गीय कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी केली. त्यांनी लावलेल्या वृक्षाचा वटवृक्ष झाला असून यामध्ये इस्माईल साहेब मुल्ला यांचेही मोठे योगदान लाभले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

इस्माईलमुल्ला जीवनगौरव पुरस्कार अनपेक्षितपणे मिळाला त्या बद्दल आशुतोष कुंभकोणी यांनी रयत शिक्षण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वकिली व्यवसाय व कार्याबद्दल बोलताना आशुतोष कुंभकोणी म्हणाले ‘वकिली व्यवसायाचा आणि शिक्षणक्षेत्राचा जवळचा सबंध आहे. आम्हाला वकिली क्षेत्रात दररोज पब्लिक परीक्षा द्यावी लागते.दररोज गृहपाठ करावा लागतो. मी दररोज पहाटे ५,३० वाजता उठतो. सकाळच्या दीड तासात अभ्यास करून अपलोड करतो आणि दिवसभर डाऊनलोड करतो.

यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी,व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे,संघटक डॉ.अनिल पाटील, कायदा सल्लागार अॅड.दिलावरसाहेब मुल्ला, संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, बी. एन.पवार, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. मोहन पाटील व डॉ. रोहन पाटील, प्राचार्य डॉ. बी .टी. जाधव,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ.अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. जे .जी जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे पदाधिकारी विविध शाखांचे प्रमुख व कर्मवीर कुटुंबीय, मासिक जडणघडणचे संपादक सागर देशपांडे, इस्माईलसाहेब मुल्ला यांचे कुटुंबीय व रयतसेवक उपस्थित होते.