सातारा  -अजिंक्यतारा रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

सातारा  – कित्येक वर्षापासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या किल्ले अजिंक्यतारा वरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पालिकेकडून रुंदीकरणासह रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे. दर्जेदार रस्त्यामुळे दुर्गप्रेमी पर्यटकांसह सातारकरांना या किल्ल्यावर आता पटकन जाता येणार आहे.

किल्ले अजिंक्यतारा पूर्वी पालिकेच्या हद्दीत नव्हता त्यामुळे पालिका प्रशासनाला किल्ल्यावर कोणतेही काम करताना अनेक मर्यादा येत होत्या . सप्टेंबर 2020 सातारा शहराची हद्दवाढ झाली किल्ला पालिकेत समाविष्ट झाला आणि त्याच्या विकासाचा मार्गही मोकळा झाला . किल्ल्याकडे जाणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक वर्ष डांबर पडले नव्हते. पावसामुळे रस्ता खडबडीत झाल्याने त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व नैसर्गिक आपत्ती व भविष्याचा वेध घेत रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोन टप्प्यांमध्ये निविदा काढण्यात आल्या. जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी रुपये तर पर्यटन विकास म्हणून पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला.

किल्ल्याच्या मुख्य महाद्वार प्रवेशापासून काँक्रिटी करणास प्रारंभ झाला. हे काम आता पायथ्याशी असल्यामुळे मंगळाई देवी मंदिराजवळ आले आहे. येत्या काही दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. स्थानिक नागरिकांची पर्यटकांची रस्त्याअभावी होणारी परवड आता थांबणार आहे. किल्ले अजिंक्यतारा मराठा समाजाची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे या किल्ल्यावर आजही इतिहासाच्या पाऊलखुणा आढळून येतात.
मुख्य बुरुज व तटबंदीची पडझड
साडेसोळा एकरात वीस विस्तीर्ण पसरलेल्या या किल्ल्यावर मुख्य दरवाजा दक्षिण दरवाजा, मंगळाई देवी व मारुती मंदिर साततळी, राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात किल्ल्याचा मुख्य बुरुज व तटबंदीची पडझड झाली आहे. पुरातत्त्व विभागाने याची वेळीच डागडूजी करावी अशी अपेक्षा आहे. किल्ले अजिंक्यतारा साताऱ्याचे वैभव आहे हे वैभव जपण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरीच्या बाजूला संरक्षण भिंत देखील बांधण्यात आली आहे. पुढील टप्प्यात किल्ल्यावर दृष्टिक्षेप गॅलरी पर्यटकांसाठी आसन व्यवस्था होणार आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली .