सातारा – अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंचणेर वंदनच्या वृध्दाचा मृत्यू

सातारा – एसटी बसमधून उतरून चालत जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात गोजेगाव, ता. सातारा येथे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता झाला.

मोहन दत्तू गायकवाड (वय ७८, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी वृद्धाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा-रहिमतपूर रस्त्यावर गोजेगाव, ता. सातारा येथे एसटीतून उतरून गायकवाड हे चालत निघाले होते. यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत प्रियांका बर्गे (वय ३२, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांनी फर्यिाद दिली आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार वायदंडे हे अधिक तपास करीत आहेत.