सातारा : कोविड हॉस्पिटलना वशिलेबाजीचे ग्रहण

स्थानिकांची उपचारासाठी फरफट ;आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
पराग शेणोलकर
कराड –
सातारा जिल्ह्यात करोनाने अक्षरशः तांडव घालला आहे. करोनाबाधित होणाऱ्यांचा आकडा प्रतिदिन हजाराच्या घरात जाऊन पोहोचला आहे. अत्यावस्थ रूग्णांना बेड मिळत नाहीत. कराड तालुक्‍यातील कोविड हॉस्पिटलना वशिलेबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यामुुळे खऱ्याअर्थाने उपचाराची गरज आहे, त्यांना मात्र, बेड मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यात स्थानिकांची मात्र फरफट सुरू आहे.
करोना महामारीशी दोन हात करताना प्रशासन सर्व पातळीवर अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. करोना केअर सेंटर आहेत तर डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी नाहीत. नियुक्‍त केलेले कर्मचारी कामावर येत नाहीत. या सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. वेळेवर ना जेवण ना नाश्‍ता. तर स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोब सुरू आहे. या सर्व घडामोडीत बेड न मिळाल्याने मरणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रशासनाची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात उच्चांकी 921 जणांची वाढ झाली आहे. जिल्ह्याचा आकडा 20 हजार पार झाला आहे. तर आजपर्यंत 11 हजार 451 जण करोनामूक्त होऊन घरी गेले आहेत. 8 हजार 543 जणांवर सध्या विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 536 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री आलेल्या अहवालात कराड तालुक्‍यात 206 तर शहरात 45 बाधितांची वाढ झाली आहे. वाढत्या बाधितांमुळे जिल्ह्यातील सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्णांना प्रवेश देण्यासाठी जागा नाही. त्यामुळे होम आयसोलेशनवर भर दिला आहे. मात्र, त्याकडेही आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करोनाबाधित रूग्णांसह करोनाबाधित नसणाऱ्यांचा उपचाराविना मृत्यू होत आहे. यासाठी प्रशासन सर्व पातळीवर जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कराड येथील बहुतांश हॉस्पिटलमध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य लोकांना सहन करण्याची वेळ आली आहे. यात उपचाराअभावी हकनाक अनेकांचा मृत्यू झाल्याने लोकांनामध्ये संताप असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

कराडमध्ये आजपासून तीन केअर सेंटर सुरू होणार
कराड तालुक्‍यात करोनाचा भडका उडाला आहे. झपाट्याने करोना बाधितांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने कराडमधील कोविड हॉस्पिटलचे बेड वाढवण्यासह नवीन कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील कृष्णा, सह्याद्री, एरम (शारदा क्‍लिनिक), श्री हॉस्पिटलमधील बेडसंख्या वाढवण्यात आली आहे. तर कराड हॉस्पिटलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याकामी पाठपुरावा करत तातडीने बेड संख्या वाढवण्यासह केअर सेंटरचे काम मार्गी लावले आहे. येथील वारणा हॉटेलमधील केअर सेंटर, टिळक हायस्कूलमधील केअर सेंटरसह कराड हॉस्पिटल आज दि. 10 रोजी सुरू करण्यात येत आहे. तसेच पार्लेच्या केअर सेंटरमध्ये सध्या ऑक्‍सिजनच्या 14 बेडसह 70 बेड शिल्लक आहेत. कराडमधील सर्व कोविड हॉस्पिटलमधून रूग्णांचा डिस्चार्ज झाल्यानंतर रिकाम्या जागी वेटिंग लिस्टप्रमाणे प्रवेश दिला जात आहे. याशिवाय आमच्याकडे संपर्क करणाऱ्या सर्वांना बेड मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.

Leave a Comment