सातारा – मुलगा-सुनेने घराबाहेर काढल्याने न्यायासाठी वृध्द दांपत्यांचे उपोषण

फलटण – मुलगा व सून सांभाळत नसल्याने कोळकी, ता. फलटण येथील वयोवृध्द दांपत्य गेल्या चार दिवसांसपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले असून आम्ही आजाराने त्रस्त असून मुलगा व सून आमचा मानसिक, शाररीक छळ करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोतीराम बाबुराव रंधवे (वय 83) व त्यांच्या पत्नी सौ. सुशिला रंधवे (वय 77) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत जोतीराम रंधवे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मला मधुमेह असल्याने माझा पाय कापल्याने मी अपंग असून पोटचा मुलगा व सून सांभाळत नसल्याने घराबाहेर वास्तव्य करावे लागत आहे. घरातील वीज पाणी वापरण्यावरही बंदी घातली आहे. आम्ही औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी स्वकष्टार्जित मालकीच्या जागा विकली असून त्यातून मिळालेल्या पैशामधून उदरनिर्वाह व अन्य दैनंदिन खर्च चालविला आहे.

मुलगा नानासो जोतीराम रंधवे व त्यांची पत्नी सौ. अंजली रंधवे यांनी आम्हांला घराबाहेर काढले असून ज्यांना आम्ही जागा विक्री केली आहे तयांना जागेचा कब्जा देण्यास अडथळा निर्माण करून शिवीगाळ दमदाटी करत आहेत. आमचा मानसिक, शाररीक छळ सुरु असल्याने आम्हाला न्याय द्यावा. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री, जिल्हा पोलिस प्रमुख , जिल्हा अधिकारी , प्रांत अधिकारी , शहर पोलीस यांना दिल्या आहेत.