सातारा – गरवारे फायबर्स फाउंडेशनतर्फे ६७ मुलींना सायकलींचे मोफत वाटप

वाई – करंजखोप (ता. कोरेगाव) येथील शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय आणि नांदवळच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना गरवारे टेक्निकल फायबर्स फाउंडेशन तर्फे ६७ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. घर ते शाळा हा शैक्षणिक प्रवास सुखकर होणार असल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील टोकाला रयत शिक्षण संस्थेचे शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय आहे. त्याअंतर्गत सोळशी- नायगाव येथे भागशाळा आणि नांदवळला भाग शाळेसोबतच ज्युनिअर कॉलेजदेखील आहे. त्यामुळे कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलामुलींची शिक्षणाची सोय झाली आहे. चवणेश्वर, पद्मावती, मोरबेंद, रणदुल्लाबाद या भागातील विद्यार्थिनी येथे शिक्षण घेतात. हा परिसर दुर्गम आहे. वाहने नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.

या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न गरवारे टेक्निकल फायबर्स फाउंडेशन यांनी मार्गी लावला. यामार्फत मुलींना ६७ सायकलींचे वाटप केले. यावेळी कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट वैभव जोशी म्हणाले, “मोठे उद्योजक होण्याचे ध्येय ठरविले, तर आपण समाजाचे मोठ्या प्रमाणात कल्याण करू शकतो. स्वतःला ज्या कामांत आनंद वाटतो, ते काम करा. म्हणजे आयुष्याचे ओझे वाटणार नाही.’
मुख्याध्यापक डी. बी. दाभाडे यांनी प्रास्ताविकात विद्यालयात असणाऱ्या भौतिक सुविधा व शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली. माजी शिक्षक विलास जगताप यांनी या सायकल मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला कंपनीचे सुनिल पानसे, विद्यालयाचे स्कूल समिती सदस्य प्रतापसिंह पवार, पांडुरंग धुमाळ, सतीश धुमाळ, सरपंच राधिका धुमाळ, दत्तात्रय पवार, सोनाली धुमाळ, राजेंद्र धुमाळ, मयूर धुमाळ, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. बागडे यांनी आभार मानले.