सातारा – कार कठड्याला धडकून नातवासह आजोबा ठार; हामदाबाज येथील दुर्घटना, मृत व जखमी एकाच कुंटुंबातील

सातारा – हमदाबाज, (ता. सातारा) गावच्या हद्दीत मेढा ते सातारा रस्त्यावर गुरूवारी दुपारी एक चारचाकी कार पुलावरील कठड्याला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील 56 वर्षीय व्यक्तीचा व तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. तर तीन महिला व तीन वर्षाची मुलगी जखमी झाले आहेत. नामदेव पाडुरंग जुनघरे (वय 56, रा. सावली, ता. जावली) व त्यांचा तीन महिन्याचा नातू अद्विक अमर चिकणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुनघरे कुंटुंबातील सात जण त्यांच्या चारचाकीने सातारच्या दिशेने येते होते. यावेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हमदाबाज (ता. सातारा) गावच्या हद्दीत सह्याद्री सुपर मार्टच्या जवळ मेढा ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावर चालक प्रसाद नामदेव जुनघरे (वय 25) यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरील सुरक्षा कठड्याना जावून धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले नामदेव पाडुरंग जुनघरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नातु अद्विक जुनघरे याचाही मृत्यू झाला. या कारमध्ये नामदेव यांच्या पत्नी सुवर्णा जुनघरे, मुलगी आरती, पुजा अमर चिकणे आणि तिची तीन वर्षाची मुलगी अन्वी हे जखमी झाले आहे. हा अपघात पाहून स्थानिकांनी गर्दी करत माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत कार चालक प्रसाद जुनघरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर करत आहेत.