सातारा – दहिवडीत दोन तासातच निघतोय ट्रान्सफॉर्मरमधून धूर

प्रवीण राजे
दहिवडी –  दहिवडी (ता. माण) येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अहिल्याबाई होळकर शेळीमेंढी फार्म येथील ट्रान्सफॉर्मर अवघ्या दोन तासातच जळाल्यामुळे दहिवडी महावितरण नक्की बोगस ट्रान्सफॉर्मरची खरेदी करताय की काय ? असा सवाल जनतेमध्ये उपस्थित झाला आहे. याच ठिकाणचा मागील चार महिन्यापासून आतापर्यंत एकूण सहा वेळा ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या प्रकार घडला आहे.

शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी गेला असता शेतीपंपाचे बटन दाबले की ट्रान्सफॉर्मर जळल्याचे समजते. त्यामुळे येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्याला ट्रान्सफॉर्मर सारखा का जळतो प्रश्न विचारले असता वीज वितरणचे अधिकारी शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढूपणा करतात. गेल्या दोन वर्षांमध्ये या परिसरात शेकडो वेळा ट्रान्सफॉर्मवर जळल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र त्याबाबत काही उपाय योजना केली जात नाही. या परिसरातील वीजवितरणचा विभागीय अधिकारी नक्की असतो तरी कुठे असा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. कायम नशिबी दुष्काळ असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून असणारी शेती पिकवण्यासाठी वीज वितरणचा मोठा आधार घ्यावा लागतो. मात्र वीज वितरण आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत असे जनतेतून चर्चेतून ऐकायला मिळत आहे.

कारणे माहिती असूनही उपाययोजना नाही
वारंवार ट्रान्सफॉर्मर कशामुळे जळतोय याची कारणे संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांना माहिती असून देखील त्यावर कोणतीही उपाययोजना न करता ट्रान्सफॉर्मर जळाल्याचे कारण समोर केले जाते. या परिसरामध्ये किती लोड आहे. त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. याकडे येथील अधिकारी जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत.

तीव्र आंदोलन करणार
प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर ट्रान्सफॉर्मर जळत आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही 10 ते पंधरा दिवसापर्यंत कोणतेही प्रकारचे दुरुस्तीचे काम लवकर होत नाही. विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या कालावधीमध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या समस्ये बरोबरच पिकालाही वेळेवर पाणी देता येत नाही. या समस्यावर महावितरणने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास सर्व ग्रामस्थ दहिवडी महावितरणच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार आहोत.
– हणमंत राजे (समस्याग्रस्त शेतकरी )