सातारा : माणचे खेळाडू तालुक्‍याचा लौकिक वाढवतील – ललिता बाबर

वरकुटे-मलवडी येथे माणदेश मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण
म्हसवड –
माण तालुक्‍याच्या मातीत संघर्षाचं बीज रोवले गेले असून खेळाच्या माध्यमातून येथील मुली देश पातळीवर यशाचा अंकुर फुलविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मुलींना पालकांसह गावकरी व माणवासियांनी पाठबळ दिल्यास देशपातळीवर खेळत असलेल्या याच मुली आपल्या गावांसह माण तालुक्‍याचं नाव ऑलिंपिकमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरतील, असा विश्‍वास माणदेश एक्‍सप्रेस धावपटू व पनवेलच्या उपजिल्हाधिकारी ललिता बाबर यांनी व्यक्त केले.

वरकुटे- मलवडी (ता. माण) येथे दिवाळीनिमित्त यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या माजी विद्यार्थी सामाजिक संघटना व पंचक्रोशीच्यावतीने आयोजित माणदेश मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी पुण्याचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, मुंबई वस्तू आणि सेवा कर उपायुक्त संदीप भोसले, तहसीलदार जीवन बनसोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप, माजी सरपंच बाळकृष्ण जगताप, विजयराज पिसे, सरपंच विलास खरात, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू काजल आटपाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेत (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक) खुला गट 10 किलोमीटर मुलांमध्ये सुशांत जेधे, उत्तम पाटील, विवेक मोरे यांनी, खुला गट 5 किलोमीटर मुलींमध्ये प्राजक्ता शिंदे, साक्षी जड्याळ, सोनाली देसाई 1600 मीटर मुलांमध्ये अनुक्रमे दादा शिंगाडे, स्वराज पाटील, बाळू पुकळे, 10 किलोमीटर पंचक्रोशीतील मुलांमध्ये रोहित बनगर, विपुल ढेरे, रोहित कोठावळे तर 16 वर्षाखालील गटात सिद्धनाथ जगताप, अथर्व तारे, राहुल तवरे यांनी यश संपादन केले. यावेळी बाबर म्हणाल्या, “”माणमधून घडणारे प्रत्येक खेळाडू माणच्या स्वाभिमानासाठी खेळत असून हे सर्व खेळाडू एक दिवस देशात आपल्या नावाचा दबदबा निश्‍चित करतील.

यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि पाठबळ गरजेचे आहे. हीच माणदेशी रत्नं ऑलिंपिकमध्ये माणच्या मातीचं नाव मोठं करणार आहेत. यावेळी नितीन वाघमोडे, अनिल देसाई, अभयसिंह जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. स्पर्धेचे संयोजन माणदेश मॅरेथॉन कमेटीच्यावतीने संस्थापक अध्यक्ष अनिकेत आटपाडकर, चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवाजी शिंगाडे, कांतीलाल आटपाडकर, छगन पिसे, बाबा पडळकर, युवराज ढेरे, गणेश खंदारे, सोमनाथ तोडकर यांनी केले. मॅरेथॉनमध्ये देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.