satara news : अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारांचे; गुरुवारी साताऱ्यात वितरण

सातारा – येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) जयंतीदिनी गुरुवार, दि. १८ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६ वाजता कै. भाऊसाहेब सोमण सभागृह, राजवाडा येथे होणार असल्याची माहिती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली. पुरस्काराचे हे सातवे वर्षे आहे.

आजच्या व्हॉटस्अॅप आणि फेसबुकच्या काळात युवक वाचनापासून दूर जात आहेत. अशा काळात वाचन संस्कृती टिकवण्याचे काम खन्याअर्थाने ग्रंथालये व वाचनालये करीत असतात. दरवर्षी अनेक लेखक विविध विषयांवर पुस्तके लिहीत असतात, प्रकाशित करीत असतात. अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम ग्रंथालये करीत असतात.

या ग्रंथालयांना तसेच वाचन संस्कृती टिकवणाच्या चळवळीमध्ये परिश्रम घेणा-या सहकार्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रासाठी भरीव असे कार्य करणा-या श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे नावे दरवर्षीं उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार देवून गौरविण्यात येते.

या वर्षीचा ग्रंथ वाचक पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांना, ग्रंथालय पुरस्कार मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय यांना, ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या विश्वस्त डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांना तर ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार पाटण तालुक्यातील मेंढोशीच्या सुभाष मोफत वाचनालय,

ग्रंथपाल जोतीराम जाधव यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाचे विश्वस्त, सीए विजयकुमार क्षीरसागर यांचे हस्ते देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे अवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.