सातारा – भारतीय संविधानाची प्रास्ताविका संविधानाचा आत्मा

कराड – भारतीय संविधानातील प्रास्ताविका म्हणजेच उद्देश पत्रिका हा संविधानाचा आत्मा आहे. या उददेश पत्रिकेतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. एक लाख सतरा हजार शब्द असणारी हिंदी व इंग्रजी भाषेतील हस्ताक्षरात लिहिलेली भारताची राज्यघटना हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. या मुलभूत कायद्यानुसारच देश चालतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

येथील शिवाजीनगर हौसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी उद्यानाचा नऊ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संविधानचे महत्व सांगताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमती सुनीता जाधव होत्या. यावेळी पालिकेच्या उप मुख्याधिकारी विशाखा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, कम्युनिस्ट नेते एम.एन. रॉय यांनी प्रथम संविधानाची मागणी केली. त्यामुळे 1935 चा कायदा पास झाला. भारतासाठी राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समितीची स्थापना झाली. डॉ. राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे अध्यक्ष, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. दोन वर्षे 11 महिने 18 दिवस राज्यघटना निर्मितीचे काम चालले. डॉ. आंबेडकरांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे स्वतंत्र भारताची राज्यघटना सुपुर्त केली. तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 होता. म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर पुढे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.

संविधानातील मुलभूत हक्क व कर्तव्य फार महत्वाची आहेत. प्रत्येक भारतीयाने यांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. भारतीय संविधानामुळेच 75 वर्षे आपल्या देशाची चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, येथील छत्रपती शिवाजी उद्यान, उद्यानातील अनेक उपक्रम, पर्यावरण संवर्धन कौतुकास्पद असून हे उदयान लोकांसाठी प्रेरणादायी राहील, असे मत मांडून या उद्यानाची धुरा सांभाळणारे चंद्रकांत जाधव यांचे त्यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांचा सपत्नीक सत्कार करून प्रशांत लाड यांनी सुलेखन केलेली “छत्रपती शिवाजी उद्यान गाथा’ सुपूर्द करण्यात आली. यावेळी कराड नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील माणिक बनकर यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दरम्यान, उद्यानात लावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाची मुळे प्रत डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर करतानाच्या बोर्डाचे आ. चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

श्रीमती सुनीता जाधव म्हणाल्या, चंद्रकांत जाधव यांनी या उद्यानाचा कायापालट करून नावारुपाला आणले. लहानांपासून वयोवृद्धासाठी एक आनंददायी ठिकाण बनवले असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात प्रा. भगवान खोत यांनी छत्रपती शिवाजी उद्यानाच्या विकासाचा प्रवास, पर्यावरणाच्या दृष्टीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उस्फुर्त लोकसहभाग, कलादालन, कवी कट्टा, गीत संध्या, वाद्य वृंद, जिजाऊ वनराई आदींची माहिती दिली.

याप्रसंगी, ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेने संविधान सप्ताहानिमित्त भरविलेले संविधान विषयक पोस्टर प्रदर्शन आकर्षक ठरले. मिथिलेस थोरात व अन्शूमन थोरात या लहान मुलांनी इंग्रजीमध्ये संविधानाची प्रास्ताविका सांगितली. यावेळी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, अशोक पाटील, सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, सेवानिवृत्त तहसीलदार मोहन डोळ, इंद्रजित चव्हाण, विलासराव जाधव, प्रा. भगवान खोत, पी.एल. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल थोरात यांनी केले.