सातारा : ‘उमेद’ च्या खरेदीदार-विक्रेता संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा  – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सातारा यांच्यावतीने ग्रामीण भागातील बचत गटांना विक्रीसाठी खात्रीशीर बाजारपेठ मिळावी या मुख्य उद्देशाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित पहिल्या जिल्हास्तरीय खरेदीदार -विक्रेता संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या संमेलनाचे उदघाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा अभियान व्यवस्थापक (मार्केटिंग) सुरज पवार, मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम उपस्थित होते. महादेव घुले म्हणाले, ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनाकरिता ‘उमेद’ मार्फत सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असून बचत गटांनीही गुणवत्तेबरोबर पॅकेजिंग व लेबलिंग वर भर दिल्यास खात्रीशीर बाजारपेठ मिळेल. संतोष हराळे म्हणाले, उमेदच्या माध्यमातून उत्पादन करणारे बचत गट विक्रेते व सातारा येथील खरेदीदार यांना संमेलनाच्या माध्यमातून जोडण्याकरता दुवा म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा काम करीत आहे. जिल्हास्तरावरील हा पहिला नावीन्यपूर्ण उपक्रम असून हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य उमेदच्या वतीने करण्यात येईल.

या संमेलनात अकरा तालुक्यातील दर्जेदार उत्पादन असणाऱ्या ६२ गटांनी विक्रेता म्हणून सहभाग घेतला. साताऱ्यातील नामांकित २२ खरेदीदारांनी सहभागी होत विक्रेते गटांना करार करून ऑर्डरही देण्यात आल्या. बचत गट विक्रेत्यांनी तांदूळ, गिर गायीचे तूप, नाचणी, इन्स्टंट पीठ, सेंद्रिय गुळ, काकवी, पेढे, लस्सी, कडीपत्ता चटणी, फळे व भाजीपाला, मशरूम बिस्किटे, पंचगव्य उत्पादन, वाघा घेवडा, गांडूळ खत, आवळा कॅन्डी, देशी अंडी, कागदी कलाकृती, लाकडी घाण्यावरील तेल, मध, मसाले, फिनेल, लोणचे, गुलकंद, मिलेट्स कुकीज, शतावरी, साबण, हळद, नाचणी, इत्यादी नाविन्यपूर्ण उत्पादने घेऊन विक्रेते बचत गट सहभागी झालेले होते. तर, खरेदीदारामध्ये पीआयपी ऍग्रो, राजपुरोहित स्वीट्स, आदिनाथ एजन्सी, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स मार्ट, किसान कनेक्ट, शहा अँड सन्स, सागर फरसाण, मोरया मेगामार्ग, स्वामी समर्थ सुगंधालय यासारखे नामांकित खरेदीदार व कंपनी प्रतिनिधींनी सहभाग घेऊन विक्रेत्यांकडून करार करून ऑर्डर घेण्यात आल्या. रुचकर व स्वादिष्ट पदार्थांना संमेलनातच ऑर्डर मिळाल्या. सहभागी बचत गटानी खरेदी- विक्रेता संमेलनाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानले. प्रास्ताविक अंकुश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मोरे यांनी तर संजय निकम यांनी आभार मानले.

नऊ गटांना संमेलनात मिळाल्या ऑर्डर
या संमेलनामध्ये रुचकर व स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ९ गटांना ११ खरेदीदारांकडून संमेलनातच ऑर्डर मिळाल्या. जिल्ह्यातील उमेद सलग्न ११ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत करार शेती करण्यासाठी रिलायन्स कंपनी व किसान कनेक्ट कंपन्यांनी करार केले. संमेलनामध्ये सहभागी झालेल्या बचतगटाकडून खरेदी-विक्री संमेलनाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानन्यात आले.