सातारा – ‘सह्याद्री’त घुमली वाघाची डरकाळी

कोयनानगर – गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन विभागाने जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात पट्टेरी वाघ, वाघाच्या पावलांचे ठसे आणि विष्ठा कैद झाली आहे.

सह्याद्री व्याघ्र पकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याची घटना आशादायी आहे. या प्रकल्पात सात पट्टेरी वाघ सोडायला राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नवीन वर्षात टप्प्याटप्प्याने सात पट्टेरी वाघांच्या नरमादीच्या जोड्या सोडायचे नियोजन वन्यजीव विभागाने केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व नसल्याची आवई प्रकल्पाच्या विरोधकांनी उठवल्याने, हा प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. चांदोली अभयारण्यात कोअर झोनमध्ये रविवारी (दि. 17) पहाटे 4.59 वाजता पट्टेरी वाघाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाले आहे. यामध्ये वाघाच्या पावलांचे ठसे, विष्ठाही निदर्शनास आली आहे. पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सतर्क करण्यात आल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी सांगितले.

या व्याघ्र पकल्पातील वाघाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेल्याने सह्याद्रीतील अन्य ठिकाणांहून सात पट्टेरी नर-मादी वाघ सोडण्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रस्तावाला राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने अखेर मान्यता दिली आहे. येत्या नवीन वर्षात टप्प्याटप्प्याने या प्रकल्पात पट्टेरी वाघ सोडण्याचे नियोजन केल्याचेही सावंत यांनी सांगितले.