सातारा – ट्रॅक्टर -दुचाकी अपघातात उपवळेचा दुचाकीस्वार ठार

फलटण – फलटण-उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत ऊसाने भरलेल्या ट्रॉलीतील ऊसाचा धक्का मोटारसायकलला लागून झालेल्या अपघातात केरबा ज्योतिबा कर्णे (वय 73, रा. उपळवे ता. फलटण) हे वृद्ध ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री साङेआठ वाजण्याच्या दरम्यान फलटण ते उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत असणार्‍या चढावर केरबा ज्योतिबा कर्णे हे टिव्हिएस एक्सेल मोटरसायकल (क्रमांक एम. एच.-11-यू -9131) वरुन उपळवेकडे जात होते. त्यावेळी चालक मोहन ग्यानबा धायगुडे (रा. बोरी ता.खंडाळा) हा त्याच्या ताब्यातील ट्रक्टर (क्रमांक एम. एच.-11 डीई 7985) दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या साईडलँप इंडिकेटर न लावता जोराने ट्रॅक्टर ट्रॉली चालवत होता.

त्याच वेळी अचानक ट्रॅक्टर उजव्या बाजूला आल्यामुळे ऊसाचा धक्का लागून केरबा कर्णे हे मोटारसायकलवरुन ट्रॉलीच्या चाकाच्या पुढे खाली पडले व गंभीर जखमी झाले. फलटण येथे उपचारासाठी घेऊन येत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरा चालक मोहन ग्यानबा धायगुडेवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सावंत करीत आहे.