औद्योगिक उत्पादनात समाधानकारक वाढ

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मॅन्यफॅक्‍चरिंग क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही असे दाखविणारी आकडेवारी आज केंद्र सरकारने जाहीर केली. जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन तब्बल 13.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे जून महिन्यात औद्योगीक उत्पादन वाढण्याऐवजी 16.6 टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उपादकता तब्बल 13 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. खाण उत्पादक 20 टक्‍क्‍यांनी तर वीज उत्पादन आठ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. एप्रिल ते जून या काळातील औद्योगिक उत्पादन 45 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

गेल्या वर्षी या काळात हे उत्पादन 35 टक्‍क्‍यानी कमी झाले होते. गेल्या वर्षी लॉक डाउनमुळे सर्व क्षेत्रात नकारात्मक परिस्थिती होती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत होत असतानाच या वर्षी मार्च महिन्यामध्ये करोनाची दुसरी लाट काही भागांमध्ये आली होती. मात्र यावेळी पूर्ण लॉकडाउन करण्याऐवजी स्थानिक पातळीवर निर्बंध जारी करण्यात आले होते. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर फारसा परिणाम झाला नाही. आगामी काळामध्ये जर ग्राहकांकडून मागणी वाढली तर औद्योगिक उत्पादन आणखी वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पतधोरणावेळी या वर्षाचा विकास दर 9.5 टक्‍के होणार असल्याचे म्हटले आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर हा अंदाज खरा ठरण्यासाठी मदत होणार आहे. आता विविध राज्यांनी करोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्बंध कमी केले आहेत.

त्यामुळे मनुफॅक्‍चरिंग क्षेत्राबरोबरच सेवाक्षेत्रही आगामी काळात वेग घेण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. मात्र उद्योग आणि आणि सरकारने आगामी काळामध्ये शक्‍य तितक्‍या जास्त लोकांना करोनाची लस देण्याची गरज आहे. अन्यथा आगामी काळामध्ये पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असे उद्योजकांच्या संघटनांनी म्हटले आहे.