‘कर्मचारीच माझे गुरु’ म्हणत बॉसकडून १२ कर्मचाऱ्यांना महिंद्राच्या कार ‘गुरुदक्षिणा’ म्हणून भेट

नाशिक – गुरुपौणिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूला मनापासून वंदन करत असतो. नुकतीच गुरुपौणिमा साजरी झाली. मात्र नाशिकमधील गुरुपौणिमेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नाशिक शहरातील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाच वेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी सुखद धक्का होती.

दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना  गुरुदक्षिणा म्हणून या कार भेट दिल्या आहेत.

याविषयी आव्हाड यांनी, “माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. तसेच नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचवणं, तसेच वर्तुळ व्यवसाय धोरण वापरून नाशिकचा पैसा हा नाशिक मध्येच कसा राहील या साठी मी नेहमी प्रयत्नशील असतो असे त्यांनी सांगितले.

महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. नाशिकमध्येच निर्मिती होणाऱ्या महिंद्रा कारचीच निवड करण्यात आली. म्हणजेच, नाशिकच्या डेअरी पॉवर कंपनीने नाशिकमध्येच उत्पादित होणाऱ्या महिंद्रा कंपनीची कार नाशिकच्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. महिंद्राच्याच शोरुममध्ये  गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात या कर्मचाऱ्यांना ही कार भेट  देण्यात आली.