पिंपरी | पशूधन घटल्‍याने शेतखताची टंचाई

पवनानगर, {नीलेश ठाकर} – रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरला आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता सुधारावी, यासाठी शेतकरी आता पुन्‍हा शेणखताचा वापर अधिक करू लागले आहेत. मावळ तालुक्‍यात सध्या खरड छाटणी झालेल्या शेताला शेणखतांची मात्रा दिली जात आहे. सोन्याच्या दराला ७३ हजार रूपयांची झळाळी मिळाली आहे. तशीच सुवर्ण झळाळी शेणखताला यंदा मिळताना दिसत आहे.

आठ टन शेणखताला तब्बल २६ हजार रूपये मोजावे लागत आहे. मात्र कमी कष्‍ट करण्‍याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल आहे. यांत्रिकी शेतीमुळे पशूधन घटले आहे. त्‍यामुळे शेणखताची टंचाई जाणवू लागली आहे.

पुणे जिल्‍ह्यातील विशेषतः मावळ तालुक्‍यातील गाय म्हशींच्या गोठ्यांमधून होणाऱ्या शेणखताचे अर्थकारण कोट्यवधी रूपयांमध्ये आहे. जमिनीत सुपीकता यावी, यासाठी शेतकरी आता सेंद्रीय शेती, जैविक शेतीवर भर देतात. त्यासाठी मुख्यतः शेणखताचा वापर केला जातो.

खरीप हंगामानंतर आता रब्‍बी हंगामही अंतिम टप्‍प्‍यात आला आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांकडून पुन्‍हा खरीप हंगामासाठी तयारी सुरू आहे. यासाठी नांगरणी आणि शेणखत टाकण्‍याचे काम सुरू आहे. नांगरणीनंतर शेणखताचे डोस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेणखतामुळे विविध सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत असतात. त्याचा फायदा पुढे शेतीतील उत्‍पादनासाठी होत असतो.

शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याने पुढील वर्षीच्या हंगामाचे नियोजन आतापासूनच केले जात आहे. त्यासाठी शेणखताची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वधारले आहेत. एका शेणखताच्या ट्रकला २६ हजार रूपये किंमत आहे.

त्यामुळे शेणखतातून कोट्यवधी रूपयांचे अर्थकारण फिरत आहे. शेणखताच्या पुरवठादारांमार्फत व्यवहार चालतात. पुण्यासोबतच मुंबई, ठाणे, कल्‍याण आदी परिसरातूनही शेणखताचा मावळ तालुक्‍यात पुरवठा होतो. पण, पुण्‍याचे शेणखत अधिक कसदार असल्याने शेतकरी त्याला पसंती देतात.

खताला जरी सोन्‍याचा भाव आला असला तरी ज्‍या जनावरांमुळे शेणखत तयार होते त्‍या जनावरांची काळजी वर्षभर घ्‍यावी लागते. जनावरांच्‍या देखभालीमुळे शेतकऱ्यांस कुठे बाहेर जाता येत नाही. जर बाहेरगावी जाणे अनिवार्य असल्‍यास ते शेजाऱ्यास जनावरांच्‍या चारापाण्‍याबाबत सांगून जातात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल

मावळ तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्‍ये गाय-म्‍हशींचे गोठे आहेत. अशाच प्रकारचे गोठे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही आहत. कांदा, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक परतीच्या प्रवासात शेणखत घेऊन येतात. साधारण एका ट्रकमध्ये सुमारे आठ टन खत वाहतूक करण्याची क्षमता आहे.

मावळ तालुक्‍यातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात शेणखताची गरज भासते. दोन वर्षापूर्वी शेणखताच्या आठ टनाला २० हजार रूपयांचा दर होता. यंदा अखेरच्या टप्प्यात शेणखताचे भाव २६ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. शेणखताचा लाभ फळधारणेला होत असतो. त्‍यामुळे शेणखताच्या भावात यंदा तीस टक्के वाढ झाली आहे, असे मावळ तालुक्‍यातील शेतकरी सांगत आहेत.