रूपगंध : संगीताच्या क्षेत्रातील चोख सोने

हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपल्या खास शैलीने ठसा उमटवणाऱ्या बप्पी लाहिरी यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला. विशेषतः 80-90 च्या दशकात ज्यांनी कॉलेजविश्‍व अनुभवले, ती पिढी बप्पीदांच्या निधनाने अधिक हळहळली. बंगाली आणि हिंदीव्यतिरिक्‍त बप्पी लाहिरी यांनी कन्नड, उडिया, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये सुमारे 5 हजार गाण्यांना स्वरसाज चढवला. याखेरीज त्यांची अनोखी गायनशैलीही लोकांच्या पसंतीस उतरली. “स्टाइल स्टेटमेन्ट’ हा शब्दही ज्या पिढीला ठाऊक नव्हता, अशा काळात बप्पीदांनी स्वतःचे “स्टाइल स्टेटमेंट’ लोकांसमोर ठेवले. संगीत क्षेत्रातील त्यांचे काम जसे चोख सोन्यासारखे होते, तसेच त्यांचे सुवर्णप्रेमही लोकप्रिय झाले.

भारताचे “डिस्को किंग’ म्हणून लोकप्रिय असलेल्या बप्पीदांच्या म्हणजेच संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीत क्षेत्राशी संबंधित व्यक्‍तींनाच नव्हे तर सर्वसामान्य भारतीय रसिकांनाही धक्‍का बसला. 16 फेब्रुवारीला ती बातमी येऊन थडकली आणि 1980-90 च्या दशकात ज्यांनी कॉलेजविश्‍व अनुभवले, ती पिढी अक्षरशः हळहळली. “डिस्को डान्सर’ चित्रपटापासून बप्पीदा डिस्कोचे अनभिषिक्‍त सम्राट बनले.

वास्तविक, संगीतकार आणि गायक म्हणूनही त्यांची कारकीर्द खूपच पूर्वी सुरू झाली होती. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्‍चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. त्यांचे वडील अपरेश लाहिरी हे प्रसिद्ध बंगाली गायक होते. आई बन्सारी लाहिरी याही गायिका आणि संगीतकार होत्या. आईनेच बप्पीदांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. बप्पीदा हे लाहिरी कुटुंबातील एकमेव अपत्य होते. संपूर्ण घरच संगीतमय असल्यामुळे लहानपणी म्हणजे अवघ्या तीन वर्षे वयाचे असताना बप्पीदा तबला वाजवू लागले. त्यानंतर त्यांनी पियानो या अवघड वाद्याची उजळणी सुरू केली. त्याचबरोबर सॅक्‍सोफोन, गिटार, ड्रम्स, ढोलक आणि बोंगो ही वाद्येही ते सफाईदारपणे वाजवू लागले.

चित्रानी यांच्याशी बप्पीदांचा विवाह 24 जानेवारी, 1977 रोजी झाला आणि या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. मुलगी रेमा लाहिरी गायिका आहेत तर मुलगा बप्पा लाहिरी हे संगीतकार आहेत. बप्पीदांनी 1974 मध्ये “दादू’ या बंगाली चित्रपटापासून संगीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. मात्र, हिंदीमध्ये त्यांचे आगमन 1973 मध्येच “नन्हा शिकारी’ नावाच्या चित्रपटाचे संगीतकार म्हणून झालेले होते. 1975 मध्ये त्यांनी “जख्मी’ चित्रपटाला संगीत दिले आणि ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापाठोपाठ 1976 मध्ये त्यांनी “चलते-चलते’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले.

1980 नंतर बप्पीदांनी बॉलीवूडमध्ये धडाकाच लावला. “डिस्को डान्सर’ चित्रपट 1982 मध्ये आला आणि सुपर-डुपर हिट झाला. त्या चित्रपटातील गाणी सर्वतोमुखी होती. मिथुन चक्रवर्ती नायक असणाऱ्या या चित्रपटातील “आय ऍम अ डिस्को डान्सर,’ “याद आ रहा है तेरा प्यार,’ “हलवावाला आ गया’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्याच वर्षी बप्पीदांनी वैशिष्ट्यपूर्ण संगीत दिलेला “नमक हलाल’ रुपेरी पडद्यावर झळकला. महानायक अमिताभ बच्चन यांचे हरियाणवी लहेजातील संवाद आणि “पग घुंगरू बांध मीरा नाची थी’सारखी बप्पीदांची निराळ्या शैलीतील गाणी यामुळे “नमक हलाल’ने लोकप्रियतेचे शिखर गाठले. “थोडी सी जो पी ली है,’ “आज रपट जाए तो हमें ना उठय्यो,’ “जवानी जानेमन,’ “रात बाकी, बात बाकी’ ही या चित्रपटातील अन्य गाणीही प्रचंड गाजली.

1994 मध्ये रूपेरी पडद्यावर झळकलेला अमिताभ बच्चन अभिनीत “शराबी’ हा चित्रपटही रसिकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतला. “मुझे नौलखा मंगा दे रे’ हे शास्त्रीय शैलीतील गीत रसिकांच्या स्मृतिपटलावर कायम कोरले गेले. “जहॉं चार यार मिल जाए वहीं रात हो गुलजार’ या चित्रपटात बप्पीदांनी एक अभिनव प्रयोग केला. गीताचे ध्रुवपद किशोरकुमार यांनी गायिले आहेत तर अंतरे खुद्द अमिताभ बच्चन यांनी गायिले आहेत. या दोहोंच्या आवाजातील फरक जाणवूच नये अशा प्रकारे बप्पीदांनी संगीताच्या शैलीही स्वतंत्र ठेवल्या आहेत. याच चित्रपटातील “मंझिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह’ ही गझल त्याकाळी संवेदनशील मनांवर आघात करून गेली होती.

अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेली ही गझल पडद्यावर पाहताना लोक गहिवरत असत. “शराबी’नंतर बप्पीदांनी 1984 मध्ये “धरम करम’ चित्रपटाला संगीत दिले. बंगाली आणि हिंदीव्यतिरिक्‍त बप्पी लाहिरी यांनी कन्नड, उडिया, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये सुमारे 5 हजार गाण्यांना स्वरसाज चढवला. याखेरीज त्यांची अनोखी गायनशैलीही लोकांच्या पसंतीस उतरली. “साहेब’ चित्रपटातील “यार बिना चैन कहॉं रे’ हे गाणे विशेष गाजले. त्याचबरोबर “याद आ रहा है’ आणि “रात बाकी’ गाण्यांमध्ये त्यांच्या गायकीची झलक दिसली.

कन्नडमध्ये “अफ्रिकादल्ली शीला,’ “कृष्णा नी बेगने बरो,’ “पुलिस मथु दादा’ हे चित्रपट त्यांनी केले. तमीळमध्ये त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांमध्ये “अपूर्व सहोदरीगल,’ “पदुम वामनपदी,’ “किजहक्‍कू अफ्रीकाविल शीला’ तर तेलुगूमध्ये “सिंहासनम्‌,’ “स्टेट राउडी,’ “राउडी इन्स्पेक्‍टर,’ “पुण्य भूमि ना’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. संगीतकार आणि गायक यांच्या पलीकडे जाऊन एक “डबिंग आर्टिस्ट’ म्हणून त्यांची ओळख फारशी कुणाला नसेल. परंतु “मोआना’ या ऍनिमेटेड चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत “तमातो’ या पात्राला बप्पीदांनी आवाज दिला आहे.

डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांचा दुसरा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे “किंग्जमॅन-2ः द गोल्डन सर्कल’. या चित्रपटात बप्पीदांनी एल्टन जॉनच्या पात्राला आवाज दिला आहे. बप्पी लाहिरी यांच्या बाबतीत आणखीही अशा अनेक बाबी आहेत, ज्या कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसतील. उदाहरणार्थ, त्यांनी एकाच वर्षात 33 चित्रपटांना संगीत देण्याचा विक्रम केला असून, तो गिनीज बुकात नोंदवला गेला आहे. 1983 ते 1985 पर्यंत म्हणजेच अवघ्या तीन वर्षांत 12 सुपरहिट चित्रपटांसाठी संगीत तयार करण्याचा बहुमान बप्पीदांच्या खात्यावर जमा आहे. 1996 मध्ये मायकेल जॅक्‍सन भारतात आला होता, तेव्हा बप्पीदांनी त्याची भेट घेतली होती.

2006 मध्ये त्यांनी झी टीव्हीवरील “सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे, 2007 मध्ये “सारेगमप चॅलेंज’चे तर “के फॉर किशोर’ या सोनी टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमाचे परीक्षण बप्पीदांनी केले होते. आज “आयपीएल क्रिकेट स्पर्धा’ प्रसिद्धीच्या शिखरावर आहे आणि शाहरुख खानचा कोलकाता नाइट रायडर्स संघही तुफान गाजत आहे. या संघासाठी बप्पीदांनी 2008 मध्ये गाणे केले होते. 2018 मध्ये त्यांच्या संगीताच्या दुनियेतील कार्याबद्दल 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्यांना “लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

स्टाइल स्टेटमेंट
संगीताव्यतिरिक्‍त आणखी एका गोष्टीसाठी बप्पीदा लोकांच्या कायम स्मरणात राहतील. ती म्हणजे त्यांची अनोखी फॅशन. “स्टाइल स्टेटमेंट’ हा शब्दही ज्या पिढीला ठाऊक नव्हता, अशा काळात बप्पीदांनी स्वतःचे “स्टाइल स्टेटमेंट’ लोकांसमोर ठेवले. गळ्यात मोठ्या सोन्याच्या साखळ्या आणि गॉगल घातलेली त्यांची प्रतिमा रसिकांच्या परिचयाची आहे. रंगीबेरंगी कपड्यांबरोबरच प्रचंड सोने अंगावर मिरवणारे बप्पीदा नेहमी म्हणत असत, “सोना मेरा भगवान है!’ अर्थात संगीत क्षेत्रातील त्यांचे कामही चोख सोन्यासारखेच आहे. शिवाय 20 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या बप्पीदांना भरगच्च दागदागिने शोभूनही दिसत असत.

– मानवेंद्र उपाध्याय