पुणे | शाळा, महाविद्यालयांनी रुजविला वैज्ञानिक दृष्टिकोन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात विविध उपक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रदर्शन, व्याख्याने, चर्चासत्र, प्रयोग सादरीकरण, परिसंवाद असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते.शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने विविध उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या वेळी शालेय विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील् आयुकात विविध दुर्बिणीची प्रारूपे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आयसर, आघारकर संशोधन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या ठिकाणीही विविध कार्यक्रम घेण्यात आले.

क्रिसेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या वेळी अंजुम रुकडीकर, शास्त्रज्ञ रत्नदीप कुंभार, डॉ. अशरीन शेख, मुख्याध्यापिका शालिनी दुबे आदी उपस्थित होते. प्रदर्शनात पवनचक्की, वायू प्रदुषण, जलप्रदूषण, आकाशगंगा, रोबोट, आधुनिक शेती, सौरऊर्जा प्रकल्प सादर केले होते. उपमुख्याध्यापिका नादिया शेख, निलोफर शेख यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले होते.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञानाबरोबरच मराठी, संस्कृत, इंग्रजी आणि गणिताचे प्रकल्प, तसेच शैक्षणिक साहित्य मांडण्यात आले होते. या प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

ज्ञानसंस्कार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर, सहचिटणीस सुधीर चौधरी, सदस्य अनिल गेलडा आदी उपस्थित होते. शाळेतील मुख्याध्यापिका सुजाता पाठक आणि विज्ञान विभागाच्या शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले.

नवीन मराठी शाळेत ई वेस्टपासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू, विविध वैज्ञानिक खेळणी, विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला. चैताली कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी मार्गदर्शन केले.

आदर्श विद्यालयात विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापिका नीलिमा लांजेवार व शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश चाफेकर, आदिश्री कदम, अनिता परदेशी, रुपाली होले, अनुराधा भोसले, अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.