पिंपरी-चिंचवडमधील शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच

  • आयुक्तांनी बदलला निर्णय; आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा येत्या सोमवारपासून (दि. 23) सुरू करण्याचा पूर्वी घेतलेला निर्णय महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बदलला आहे. सध्या शहरातील शाळा बंदच राहणार असून, 30 नोव्हेंबर रोजी नव्याने आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यास राज्याच्या शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने आदेश जारी करताना स्थानिक पातळीवर करोनाची स्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी शासन आदेश जारी होताच शहरातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश जारी केले होते.

दिवाळीनंतर शहरात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या या निर्णयाला विरोध होत होता. त्यातच पुणे, मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याबाबत पालकांमधून आग्रह वाढला होता.

त्याची दखल घेत आयुक्त हर्डीकर यांनी आज नव्याने सूचना जारी करत 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी, पालकांची संमती, सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची वाहतूक, शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण तसेच शाळा सज्जतेबाबतचा नव्याने आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतची तारीख निश्‍चित केली जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

शाळा सुरू करण्याबाबत घाई नको – महापौर
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, शहरातील रुग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढलेली दिसून येत आहे. मागील गणेशोत्सवाचा अनुभव लक्षात घेता उत्सवानंतर वाढलेली रुग्णसंख्या दिवाळीनंतरच्या काळात वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेऊ नये, अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील करोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यात संस्था चालक, पालकांच्या बरोबर सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, असेही महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment