Hockey | राष्ट्रीय शिबिरासाठी 30 हॉकीपटूंची निवड

नवी दिल्ली – हॉकी इंडियाने शनिवारी वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी 30 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची निवड जाहीर केली आहे. हे राष्ट्रीय शिबिर 4 ऑक्‍टोबरपासून बेंगळुरू येथे सुरू होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले आणि 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आगामी 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या कामगिरीत सुधारणा करण्याच्या हेतूने आतापासूनच तयारी केली जात आहे. राष्ट्रीय शिबिरासाठी मुख्य गटात पीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा, हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास आणि मनप्रीत सिंग यांचा समावेश आहे.

आगामी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराबाबत मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले, करोना काळात खेळाडू दीर्घ आणि योग्य विश्रांती घेत आहेत. मला विश्‍वास आहे की ते राष्ट्रीय शिबिरात परत येण्यास उत्सुक असतील आणि पुढील वर्षासाठी आमच्या ध्येयावर पुन्हा लक्ष केंद्रित करतील.
आम्ही वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टिकोनातून आणि एक संघ म्हणून दोन्ही ऑलिम्पिकमधील आमच्या कामगिरीतून पुढे जात आहोत.

खेळाडूंनी टोकियोचे यश मागे सोडले पाहिजे आणि 2022 मध्ये व्यस्त हंगामापूर्वी नवीन सुरुवात केली पाहिजे. ऑलिम्पिकमधील यशामुळे निश्‍चितच आत्मविश्‍वास वाढला आहे; परंतु आता खेळाडूंनी 2022 मध्ये व्यस्त हंगामासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सज्ज व्हावे, असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात हार्दिक सिंह, नीलाकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद, सिमरनजीत सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरसाहिबजीत सिंग, शमशेर सिंग, वरुण कुमार, जरमनप्रीत सिंग, दीप्सन तिर्की, निलम संजीप झेस, जसकरन सिंह, राजकुमार यांचा समावेश आहे.