वारकरी विमा योजनेसाठी इफ्को टोकियो कंपनीची निवड

मुंबई : राज्य शासनाने वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेल्या विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता राज्य सरकारकडून ही विमा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेखाली 15 लाख वारकऱ्यांकरिता विमा हप्ता भरण्यासाठी 2 कोटी 70 लाख रुपये इतकी रक्कम इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीस देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ही योजना आषाढी वारी 2023 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहील. या योजनेचा विमा कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाचा राहील. या योजनेंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्‍यक राहील.