केसनंदच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली :  केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे,उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदी प्रमोद हरगुडे व उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने नवनियुक्त सरपंच उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी सरपंच मिलिंद हरगुडे,आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्या वतीने केसनंद येथे बिनविरोध निवडीची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीच्या साह्याने बनवलेला मोठा हार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात घालण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात झालेल्या मिरवणुकीने एकच उत्साह संचारला होता.

पुणे महानगरपालिकेत वाघोली चा समावेश झाल्यानंतर वाघोली नंतर प्रतिष्ठेचे गाव म्हणून केसनंद गावाचा उल्लेख केला जात असल्याने व केसनंद गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जास्तीत जास्त विकास कामे करून नागरिकांच्या समस्या सोडवणार सरपंच असल्याचे प्रमोद हरगुडे यांनी सांगितले आहे.