जिल्ह्याच्या विकासासाठी शशिकांत शिंदेंना लाेकसभेत पाठवा

उंब्रज – आ. शशिकांत शिंदे हे सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे लढवय्या नेते आहेत. तो माथाडी कामगारांचा मुलगा असल्याने त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याबद्दल लोकांना आस्था आहे. केंद्रातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी शशिकांत शिंदे यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.

उंब्रज (ता. कराड) येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आ. पाटील बोलत होते. याप्रसंगी आ. शशिकांत शिंदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सविता बर्गे, देवराज पाटील, अजित पाटील चिखलीकर, पंचायत समिती माजी सदस्य सोमनाथ जाधव, कारखान्याचे संचालक डी. बी. जाधव, हंबीरराव जाधव, सौ. मनीषा देसाई, सौ. साधना ढवळे, सौ. साधना बर्गे, पै. संजय थोरात, माणिकराव पाटील, लालासाहेब कवठेकर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात या जिल्ह्यात मोठी धरणे, रस्त्यांचे जाळे, आरोग्य सुविधा अशी महत्त्वाची कामे केली. उंब्रज भागाला जल सिंचनाच्या योजना करून नागरिक व शेतकऱ्यांना न्याय दिला. मोदींनी ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगून लोकांच्या अपेक्षाभंग गेला आहे. देशातील महागाईने सर्वसामान्य कुटुंबे त्रस्त झालेली आहेत. कर स्वरूपात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्या बदल्यात वर्षाला फक्त सहा हजार रुपये देऊन लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होणार आहेत.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पावसातील एका सभेमुळे देशाचे राजकारण बदलले होते. आता पाऊस नसला तरी माणसांच्या उपस्थितीमुळे मतांचा पाऊस पडणार आहे आणि दिल्लीला आपली तुतारी नक्कीच वाजेल, असा विश्वास आहे. चांगला खासदार होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सध्याची जनता कोणाचेही न ऐकता मनात असेल तेच करणार आहे, असे त्यांनी सांगितले.