पुणे | ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. पां. ह. कुलकर्णी यांचे निधन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आयुर्वेद विषयाचा १९८० च्या दशकामध्ये परदेशात परिचय करून देणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. पांडुरंग हरी ऊर्फ पां. ह. कुलकर्णी यांचे कर्करोगाने रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आयुर्वेद पदवीधर झाल्यानंतर गेल्या सहा दशकांपासून कुलकर्णी यांनी आयुर्वेद संशोधन, लेखन आणि संपादन क्षेत्रात विपुल कार्य केले. दीर्घायू इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून १९८३ पासून शास्त्रीय लेखांवर आधारित प्रकाशित होणाऱ्या ‘दीर्घायू’ या वार्षिकांकाचे ते संपादक होते.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), राष्ट्रीय शिक्षण मंडळ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रसशाळा, नानल रुग्णालय या संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष या नात्याने कार्य केले. याखेरीज त्यांनी विपुल लेखन करून साहित्य क्षेत्रात योगदान दिले होते.

माजी नगर संघचालक नाना कचरे यांचे निधन
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वानवडी भागाचे माजी संघचालक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य रघुनाथ म्हस्कूजी तथा नाना कचरे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने राहत्या घरी वानवडी येथे निधन झाले.

ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सून, जावई आणि नातवंडे आहेत. शनिवारी सायंकाळी वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले, त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार योगेश टिळेकर, संघाचे महेश करपे, प्रसाद लवळेकर, विश्व हिंदू परिषदेचे पांडुरंग राऊत, जनसेवा बँकेचे रवी तुपे, राजेंद्र वालेकर आदी उपस्थित होते.

पुण्याच्या पूर्व भागात रा. स्व. संघाचे काम उभे करण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता. वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा या भागात संघ कामाबरोबरच, जनसंघाच्या कामात देखील नाना सक्रीय होते. १९७२ मध्ये हडपसर येथे जनसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच्या कार्यात १९७८ पासून ते सहभागी होते, त्यांनी सहकार चळवळीत देखील भरीव काम केले.

जनसेवा न्यास, अपंग कल्याणकारी संस्था, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना या सर्व संस्थांच्या उभारणीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. अखेरपर्यंत त्यांनी संघ कार्याच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात नाना अखेरपर्यंत कार्यरत होते.