वार्धक्‍यात नको ‘नटसम्राट’चे भोग ! संपत्तीचे मृत्युपत्र करण्यावर ज्येष्ठ नागरिकांचा भर; करोनानंतर दस्तांत वाढ

 

 

गणेश आंग्रे पुणे, दि. 16 -आयुष्याच्या संध्याकाळी संपत्ती मुलांच्या नावावर करायची अन्‌ निर्धास्त व्हायचं. अशीच आजवर ज्येष्ठांची भूमिका असायची. अलीकडे मात्र ही भूमिका बदलतेय. उतारवयात “नटसम्राट’चे भोग नकोत, की मृत्यूपश्‍चात कुटुंबीयांत कलह, यामुळे मृत्यूपत्र करण्यावर भर दिला जात आहे. मागील 20 महिन्यांत राज्यात 81 हजार 216 मृत्यूपत्रांची नोंदणी झाली आहे.

करोना संकटाच्या काळानंतर नागरिकांमध्ये मृत्यूपत्र करण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस कायदेशीर बाबींविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. यामुळे मृत्यूनंतर संपत्तीवरून होणारे वाद टाळण्यासाठी नागरिक आपल्या इच्छेनुसार मृत्यूपत्र तयार करून ते नोंदवित आहेत. जिवंतपणी संपत्तीचे वाटप केले तर कदाचित मुले सांभाळतीलच, असे नाही. मुलांनी सांभाळले नाही तर उतारवयात जगणे अवघड होईल. त्यामुळे मृत्यूनंतर मृत्यूपत्राद्वारे संपत्तीचे वाटप करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

आठ महिन्यांत
35 हजार मृत्युपत्रे
राज्यात 2021 मध्ये 46 हजार 216 मृत्युपत्रे नोंदविण्यात आली. यातून 23 लाख 59 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2022 या आठ महिन्यांत 35 हजार मृत्युपत्रे नोंदविण्यात आली असून, त्यामधून 9 लाख 76 हजार रुपयांचा महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाला मिळाला आहे.

कायदेशीर जनजागृती वाढल्याने नागरिक मृत्यूपत्र अथवा इच्छापत्र नोंदवित आहेत. मृत्यूपत्र केल्यानंतर ते नोंदविणे (रजिस्टर) करणे अधिक योग्य आहे. मृत्यूपत्र केल्याने संपत्तीवरून वारसांमध्ये होणारे वाद टाळता येतात. तसेच मालमत्तेची कुटुंबियांनाही माहिती होते. संपत्ती कोणाला द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार संपत्तीचे वाटप होते.
-ऍड. विक्रम वैद्य

गेल्या आणि या वर्षातील मृत्यूपत्रांची झालेली नोंद
महिना20212022
जानेवारी38354362
फेब्रुवारी40914704
मार्च39544674
एप्रिल17244998
मे15565162
जून37815336
जुलै46854026
ऑगस्ट47361738
(दि. 12 ऑगस्टपर्यंत)