“सात जन्म हाच पती मिळू द्या.. अरे काही चॉईस आहे की नाही’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

मुंबई : काल ‘8 मार्च’ रोजी सगळीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला असून, यावेळी सर्व स्तरातून महिलांना या दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. आणि याच दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यक्रमाला संबोधित केले होत. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. “महिलांसाठी एकचं दिवस का साजरा करायचा हे मला आजपर्यंत कळत नाही. उद्या काय करायचं..’, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, अनेक गोष्टींवर राज ठाकरेंनी यावेळी लक्ष केंद्रित केलं.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.., “मला वटपोर्णिमेला दोरी बांधणाऱ्या महिलांना पाहून वाईट वाटतं. त्यांना मनातून उलटे बांधायची इच्छा असते. सात जन्म हाच पती मिळू द्या.. हे कोणी सांगितल. अरे काही चॉईस आहे की नाही… एकच सात-सात वेळेला कशाला घेऊन बसायचे”, अशी मिश्किल टिप्पणी देखील ठाकरेंनी यावेळी केली.

तसेच ते पुढे म्हणाले, “महिलांना सहकार्य करण्यास आम्ही आहोतच. पण महिलांनी पुढाकार घ्यावा. अनेक गोष्टी आपण व्हाट्सअपच्या नादात विसरलो आहोत. मला आठवते आमची आई, गच्चीवर पापड, कुरडया वाळू घालायच्या पण आता लिज्जतनं इज्जत काढल्यामुळे फारसे कुणी त्याच्या वाट्याला जात नाही…’ असं देखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, महिला दिनानिमित्त राज ठाकरेंनी सोशल मीडियावर देखील एक पोस्ट शेअर करत महिला वर्गाला खास शुभेच्छा दिल्या होत्या… राज ठाकरेंनी आजच्या त्यांच्या पोस्टमध्ये महिलांच्या प्रगतीचा उल्लेख केला आहे. “आज जागतिक महिला दिन… सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे.

आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे”, असे या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे.