“सह्याद्रि’च्या सभासदांना दरमहा सात किलो साखर; बाळासाहेब पाटील यांची घोषणा

कोपर्डे हवेली  (प्रतिनिधी) – सभासदांना दरमहा सात किलो साखर दहा रुपये किलो दराने देणार असल्याची घोषणा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

सह्याद्रि कारखान्याची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला मृत सभासद व देशाची सेवा करताना हुतात्मा झालेल्या वीर जवान, शेतकरी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पाटील पुढे म्हणाले, येत्या 2023- 24 च्या गळीत हंगामाकरिता कारखान्याकडे 21 लाख 424.63 हेक्‍टर ऊसाची नोंद गळीतासाठी झाली आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस अपेक्षेएवढा न झाल्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम होऊन हेक्‍टरी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्‍यता आहे.

या सर्व बाबी विचारात घेता कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस क्षेत्रातून गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली असून 2022- 23 च्या गळीत हंगामाच्या अखेरीस प्रकल्पाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

कारखान्यात तयार झालेल्या बीफ हेवी मोलॅसिस पासून सहा लाख 90 हजार 707 लिटर्स इथेनॉल आणि नऊ लाख 34 हजार 319 लिटर रेक्‍टिफाइड स्पिरिटचे उत्पादन घेण्यात आले आहे. उत्पादित झालेले इथेनॉल सरकारी उपक्रमातील मे. इंडियन ऑइल, गोवा या कंपनीस प्रतिलिटर 60 रुपये 73 पैसे एक्‍स मिल या दराने विक्री करण्यात आले आहे.

याप्रसंगी चिखलीचे अजित चिखलीकर यांनी सभासदांसाठी कारखाना कार्यस्थळावर सुसज्ज रुग्णालयात उभारण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. कोपर्डे हवेली येथील सभासद भरत चव्हाण, नडशीचे आनंदराव थोरात यांच्यासह सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाकडून समर्पक उत्तरे देण्यात आली.

यावेळी जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी जि.प. सदस्य जितेंद्र पवार, बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे, तानाजीराव साळुंखे यांच्यासह सर्व आजी- माजी संचालक, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले. दरम्यान, कारखाना कार्यस्थळावर वार्षिक सभा सुरू असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. सभास्थळी पत्राचे शेड उभारण्यात आल्याने जोरदार पावसात देखील विना व्यत्यय सभा पार पडली. त्यामुळे या नियोजनाबद्दल सभासदांनी बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.

पाणीपुरवठा संस्थांना दिलासा देणार
महाराष्ट्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना मार्च 2023 अखेर 1.16 पैसे प्रति युनिट या दराने वीज आकारणी होत होती. परंतु, एप्रिल 2023 पासून 5 रुपये 86 पैसे प्रति युनिट या दरानुसार महावितरणने संबंधित संस्थांना वीज बिले दिली आहेत.

परंतु, यापूर्वीच्या सवलत दराने वीज आकारणी व्हावी, यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सवलतीचा दर कायम ठेवण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.