Lok Sabha Election 2024 । शाहू महाराजांविरोधातील उमेदवारबाबत सस्‍पेन्‍स कायम

Shahu Maharaj | kolhapur | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागावाटपाचा पेच सुटल्याचे दिसत नाही. मात्र, कोल्‍हापूरमध्‍ये राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवारी लढतील यावरही तिन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. थेट छत्रपतींनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे निश्चित करून महाविकास आघाडीने आपला डाव खेळला आहे. आता त्याला महायुतीकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणे रंजक असेल.

भाजप शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समरजित घाटगेंना उमेदवारी देणार की धनंजय महाडिकांना मैदानात उतरवणार? युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

दरम्‍यान, कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. 1957 आणि 1977 च्या निवडणुकीत इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1998 पर्यंत कोल्हापूरने आपले मत काँग्रेसच्या पारड्यात टाकले आहे.